Dussehra 2023 | देशातील सर्वात मोठ्या 171 फूट उंचीच्या रावणाचे दहन येथे होणार, पाहा खर्च किती आला
हरियाणाच्या पंचकुला येथील रावण दहन विशेष मानले जाते. येथे सर्वात मोठा रावण तयार करण्याची परंपरा यंदाही पाळली गेली आहे.
चंदीगढ | 23 ऑक्टोबर 2023 : देशात सर्वत्र विजयादशमी म्हणजे दसरा ( Dussehra 2023 ) महोत्सवाची धूम आहे. उद्या मंगळवारी 24 ऑक्टोबर रोजी देशभरात रावणाच्या पुतळ्याचं दहन केले जाणार आहे. दरवर्षी प्रमाणे हरियाणाच्या पंचकुला येथे देशातील सर्वात मोठा रावणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. हा पुतळा तब्बल 171 फुटाचा असून उद्या दसऱ्याला या सर्वात मोठ्या रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाणार आहे. हरियाणाच्या पंचकुलात दरवर्षी रावणाचा सर्वात मोठा पुतळा बनविण्याची परंपरा यंदाही कायम राखली आहे.
उद्या दसरा म्हणजे विजयादशमीचा सण आहे. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करुन लंकेवर विजय मिळविल्याचा आनंद दसऱ्याला रावण दहन करुन साजरा केला जातो. हरियाणाच्या पंचकुला येथील रावण दहन विशेष मानले जाते. येथे सर्वात मोठा रावण तयार करण्याची परंपरा यंदाही पाळली गेली आहे. पंचकुला सेक्टर पाच येथील शालीमार मॉलजवळील मैदानात हा भलामोठा 171 फूटाचा रावणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. तीन महिन्यांच्या मेहनतीनंतर हा पुतळा बनून तयार आहे. या पुतळ्याला तेजिंदर चौहान आणि त्यांच्या टीम तयार केले आहे. उंच पुतळा तयार करण्यात तेजिंदर चौहान यांचे नाव पाच वेळा लिम्का बुक मध्ये नोंदले गेले आहे. अंबाला येथील बराडा येथेही असाच 125 फूटांचा रावणाचा पुतळा तयार केला आहे. त्यालाही पाहण्यासाठी लोक लांबून येत आहेत.
येथे ट्वीट पाहा –
दुनिया का सबसे बड़ा रावण || पंचकूला || Tallest Ravan Panchkula 2023. #Panchkula #dusshera #raavan #ravan #worldrecord #chandigarh #pinjore #kalka #manimajra #mohali #vlogger #Zirakpur #Derabassi #diwali #viralvideos #viralreels #likesforlike pic.twitter.com/vYhiqx3TyP
— Jaspreet Singh Gulati (@iJaspreetGulati) October 22, 2023
हरियाणा पंचकुला येथील रावणाच्या 171 फूटाच्या पुतळ्याला 25 कारागिरांनी तीन महिन्यांच्या कठोर मेहनतीनंतर तयार केले आहे. या रावणाला तयार करण्यासाठी 20 लाख रुपयांचा खर्च आला आहे. या पुतळ्याला तयार करण्यासाठी 25 क्विंटल लोखंड, 500 बांबूचे तुकडे, 3000 मीटरची मॅट, 3500 मीटरचे कापड आणि 1 क्विंटल फायबरचा वापर केला आहे. या पुतळ्याचे दहन करण्यासाठी यात इको फ्रेंडली फटाके लावण्यात आले आहेत. या फटाक्यांना तामिळनाडू येथून मागविण्यात आले आहे. रावणाचा हा पुतळा इको फ्रेंडली आहे आणि त्याला रिमोटद्वारे पेटविण्यात येणार आहे.
35 वर्षांपासून पुतळा निर्मिती
अंबालाच्या बराडा गावाचे रहिवासी तेजिंदर सिंह यांना हा पुतळा तयार केला आहे. तेजिंदर गेल्या 35 वर्षांपासून रावणाचा पुतळा तयार करीत आहेत. तेजिंदर यांनी जगातील सर्वात मोठा 221 फुटाचा रावणाचा पुतळा साल 2019 रोजी चंदीगढच्या धनास गावात तयार केला होता. 56 वर्षांचे तेजिंदर सिंह राणा हौस म्हणून रावणाचा पुतळा तयार करतात.