Delhi Bomb Threat : अगोदर शाळा आणि आता बडे हॉस्पिटल; दिल्लीतील बॉम्ब धमक्यांचे सत्र थांबेनाच
दिल्लीत पुन्हा एकदा बॉम्बच्या धमकीचे सत्र सुरु झाले. या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीतील अनेक शाळा, महाविद्यालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी देणारे ई-मेल आले होते. त्यावेळी एकच खळबळ माजली होती. आता बड्या रुग्णालयांना टार्गेट करण्यात आले आहे...
दिल्ली पुन्हा गॅसवर आहे. यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातीलाच दिल्लीतील अनेक शाळा-महाविद्यालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली होती. ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता शहरातील बड्या रुग्णालयांना धमकीचा ई-मेल आला आहे. यामध्ये दीप चंद बंधू हॉस्पिटल, जीटीबी रुग्णालय, दादा देव हॉस्पिटल, हेडगेवार सह इतर रुग्णालयांना धमकीचा मेल आला आहे. दिल्ली अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यानुसार पोलिसांच्या मदतीने शोध मोहिम राबविण्यात येत आहे. धमकीचा मेल येताच पहिल्यांदा दीप चंद बंधू रुग्णालयाने पोलिसांसह अग्निशमन विभागाला सकाळी 9:45 वाजता पहिला फोन केला होता.
फोनचा खणखणाट
पहिला फोन आल्यानंतर तपास पथक, बॉम्ब स्कॉड पथक, अग्निशमन दल आणि इतर पथक तातडीने रवाना झाले. पण त्यानंतर फोनचा खणखणाट सुरुच होता. 10:55 मिनिटांनी दादा देव हॉस्पिटल, 11:01 वाजता हेडगेवार रुग्णालय, 11:12 मिनिटांनी जीटीबी हॉस्पिटलने कॉल केला. शहरातील इतर रुग्णालयांना पण धमकीचा मेल मिळाला आहे. त्यानंतर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली. गेल्या दोन आठवड्यात या धमकीसत्रामुळे पोलीस यंत्रणा सतर्क आहे.
दोनदा केली तपासणी
- पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने दोनदा या परिसराची चांगली तपासणी केली. पण कुठेही बॉम्ब, अथवा बॉम्ब सदृश्य काहीच सापडले नसल्याची माहिती हेडगेवार हॉस्पिटलचे सुरक्षा अधिकारी व्ही. के. शर्मा यांनी माहिती दिली. रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती प्राप्त ई-मेलमध्ये देण्यात आली होती. या रविवारी पण दिल्लीतील बुरारी रुग्णालय आणि संजय गांधी हॉस्पिटलला असाच धमकीचा मेल मिळाला होता.
- यापूर्वी 1 मे रोजी दिल्लीसह NCR मध्ये 150 हून अधिक शाळांना बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा ई-मेल आला होता. त्यामुळे शाळांनी पालकांना तातडीने याविषयीची माहिती देत विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले होते. त्यावेळी दिल्लीत एकच गदारोळ माजला होता. पोलिसांनी सर्व शाळांची कसून तपासणी केली असता, काहीही धोकादायक सापडले नव्हते.
धमकीच्या-ईमेलमध्ये काय
या धमकीच्या ई-मेलमध्ये रुग्णालयाच्या इमारतीत बॉम्ब पेरल्याची माहिती देण्यात आली होती. स्फोटके तुमच्या इमारतीत ठेवण्यात आली आहे. पुढील तासाभरात त्याचा स्फोट होईल. ही धमकी नाही. बॉम्ब निकामी करण्यासाठी तुमच्याकडे अवघा काही तास शिल्लक आहे. नाहीतर स्फोट होऊन त्यातील निरपराधांचे रक्त तुमच्या हातावर असेल, असे धमकी ई-मेलमध्ये म्हटले होते. रशियातील एका गटाचा यामागे हात असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा ई-मेल Bible.com वरुन पाठविण्यात आल्याचे समोर येत आहे.