स्क्रीन शॉट शेअर केले तर पंतप्रधानांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही; अरविंद केजरीवाल यांचा खळबळजनक दावा
धमकीचे मेसेज मी पाहिले आहेत असा धक्कादायक खुलासा देखील अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
नवी दिल्ली : स्क्रीन शॉट शेअर केले तर पंतप्रधान मोदींना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या अधिवेशनात केजरीवाल(Prime Minister Narendra Modi) यांनी मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली.
पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार हिरेन जोशी यांच्याकडून देशभरातल्या अनेक मोठ्या वृत्तवाहिन्यांच्या मालकांना आणि संपादकांना धमकी दिली जात असल्याचा आरोप देखील केजरीवाल यांनी केला आहे.
धमकीचे मेसेज मी पाहिले आहेत असा धक्कादायक खुलासा देखील अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. धमकीचे स्क्रीन शॉट मी सोशल मीडियावर टाकले तर पंतप्रधान मोदी यांच्यासह हिरेन जोशी यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही असे केजरीवाल म्हणाले.
गुजरात विधानसभा निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने भ्रष्टाचारविरोधी कारवाईच्या नावाखाली आम आदमी पक्षाला चिरडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
केंद्रातील मोदी सरकारकडून आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांना तसेच नेत्यांना विविध प्रकरणांत विनाकारण गोवले जात आहे. अनेक नेत्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आम आदमी पार्टीची गुजरातमधील वाढती लोकप्रियता भाजपला पाहवत नाही. आपच्या प्रभावामुळे गुजरात हातातून जाईल अशी भिती भाजपला वाटत आहे. यामुळेच आप नेत्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याची टीका केजरीवाल यांनी केली आहे.