मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कुणाला दिला शाप? म्हणाल्या… विनाश होवो…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे दिल्ली कोर्टाने त्यांचा जामीन थांबवला आणि त्यांना दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवले. सीबीआयने केजरीवाल यांना ताब्यात घेतले आहे. यामुळे सुनीता केजरीवाल संतापल्या आहेत.
आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊस अव्हेन्यू न्यायालयाने केजरीवाल यांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन नाकारला. तसेच, त्यांना तीन दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवले आहे. त्यामुळे सीबीआयने त्यांना राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या परिसरातच अटक केली. पतीच्या अडचणी वाढत असल्याचे पाहून मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचा संताप अन्वर झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ‘आता सर्वांच्या बुद्धीसाठी नाही तर हुकूमशहाच्या नाशासाठी प्रार्थना करणार आहे’ असे म्हटले आहे.
सुनीता केजरीवाल यांनी पतीच्या जामिनावर बंदी आणि सीबीआयने केलेली अटक यांना हुकूमशाही आणि आणीबाणी असल्याचे म्हटले आहे. ट्विटरवर त्यांनी म्हटले आहे की, ‘अरविंद केजरीवाल यांना 20 जूनला जामीन मिळाला. ईडीने त्याविरोधात कोर्टात धाव घेऊन तत्काळ स्थगिती मिळविली. आता दुसऱ्या दिवशी सीबीआयने त्यांना आरोपी बनवले आणि आज अटक केली. केजरीवाल तुरुंगातून बाहेर येऊच नयेत यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नशील आहे. हा कायदा नाही. ही हुकूमशाही आहे, ही आणीबाणी आहे अशी टीका त्यांनी केली.
सुनीता केजरीवाल यांनी ट्विटरवर आपला संताप व्यक्त करताना ‘आता आपली प्रार्थना बदलण्याचा निर्णय घेत आहे,’ असे म्हटले आहे. ‘आतापर्यंत माझी नेहमीच प्रार्थना होती की देवाने सर्वांना बुद्धी द्यावी. पण, आता हुकूमशहा नेस्तनाबूत व्हावा. त्यांचा विनाश व्हावा हीच माझी प्रार्थना असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही केजरीवाल यांच्यावर अत्याचार होत असले तरी ते झुकणार नाही असे म्हटले आहे. त्यांनी केजरीवाल यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. ‘हे चित्र हुकूमशाहीविरुद्धच्या संघर्षाचे आहे. हवे तेवढे अत्याचार करा. परंतु, अरविंद केजरीवाल झुकणार नाहीत. ईडी कोर्टातून जामीन मिळाल्यानंतर सीबीआयची अटक हा भाजपच्या इशाऱ्यावर सीबीआयचा उघड गैरवापर आहे. ज्या पद्धतीने तुम्ही संस्कृती आणि राजकारण विसरलात, त्याचप्रमाणे तुमचे नावही जालीममध्ये लिहिले जाईल, अशी जळजळीत टीकाही भगवंत मान यांनी केली आहे.