दिल्लीचं चित्र स्पष्ट… भाजपला सत्ता, आप विरोधात, काँग्रेसचं काय?; A टू Z निकाल वाचा एका क्लिकवर
Delhi Election Result 2025 : दिल्लीतील सत्तेच्या महाकुंभात भाजपाने एकदाचे अमृत स्नान केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाने बहुमताचा टप्पा केव्हाच ओलांडला आहे. तर आप विरोधी गोटात बसणार आहे. काँग्रेसचं गणित एव्हाना तुम्हालाही कळलं असेलच, नाही का?

अखेर भाजपाचा 27 वर्षांचा वनवास संपला आहे. दिल्लीती सत्तेच्या महाकुंभात भाजपाने विजयाचे स्नान केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाने बहुमताचा टप्पा केव्हाच ओलांडला आहे. हाती आलेल्या आकड्यांनुसार, 70 सदस्य असलेल्या विधानसभेत भाजपाने 47 हून अधिक जागी मुसंडी मारली आहे. तर आप 23 जागांवर आपटले आहे. त्यामुळे आप विरोधी गोटात बसणार आहे. काँग्रेसचं गणित एव्हाना तुम्हालाही कळलं असेलच, नाही का?
27 वर्षांचा वनवास संपला
दिल्लीत भाजपाचा 27 वर्षांचा वनवास संपला. भाजपा मोठ्या बहुमताने दिमाखात सत्तेत परतली. आम आदमी पक्षाच्या दिग्गजांची धूळधाण झाली. भाजपाचा विजयासोबतच आपचा मजबूत किल्ला जमीनदोस्त झाला. भाजपाने केवळ विजयच मिळवला नाही, तर मुसंडी मारली. अर्थात दिल्लीतील या विजयाचे खरे शिलेदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानण्यात येते. त्यांनी अखेरच्या सत्रात, तीन दिवसात जी खेळी खेळली तिचा मोठा परिणाम दिसून आला. निवडणुकीचे वारे फिरले.




तो निर्णय ठरला मास्टरस्ट्रोक
तर दिल्ली विधानसभा निवडणूक काळातच मोदी सरकारचे बजेट सादर झाले. गेल्या काही वर्षात मोदी सरकारने मध्यमवर्गाकडे मोठे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे नाराजीचा सूर होता. दिल्लीत केंद्रीय कर्मचाऱ्यांसह इतर मध्यमवर्ग 45 टक्क्यांच्या घरात आहे. नेमका हाच मुद्दा भाजपाने पथ्यावर पाडून घेतला. बजेटमध्ये पगारदार वर्गाचे 12 लाखांचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले. तर 75 हजारांचे अतिरिक्त सूट, रिबेट मिळाले. त्यामुळे आपच्या बाजूने झुकलेला मध्यमवर्ग अचानक भाजपाकडे वळला. हीच खेळी गेमचेंजर ठरली. तर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाने भाजपाला मोठी सहानुभूती मिळाली.
रस्ते, पाणी, प्रदूषणाने ‘आप’टी बार!
आपकी बार भाजप सरकारचा नारा देत जनतेने रस्ते, पाणी, प्रदूषणाच्या विषयावर अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला ‘आप’टी बार दिला. दिल्लीतील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. बुराडी ते संगम विहार आणि पटपडगंज ते उत्तमनगर याच नाही तर इतर अनेक भागातील रस्त्यांची दुरावस्था भाजपाने हिरारीने मांडली. या भागातील 10 वर्षात एकदाही रस्त्याचे मोठे काम न झाल्याचा दावा करण्यात येत होता.
तर दिल्लीत टँकरच्या वाऱ्या वाढल्या होत्या. उन्हाळ्यात तर पाण्याची भीषण स्थिती होती. भाजपाने स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाणी देण्याचे आश्वासन दिले. मोफत योजनांपेक्षा पाणी हा मुद्दा जोरकस ठरला. दुसरीकडे यमुना नदीचे प्रदूषण, दिल्लीतील दूषित हवा. प्रदूषणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला होता. हिवाळ्यात सकाळची दृष्यमानता अगदी कमी झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे मुस्लिम मतदारांमध्ये फूट पाडण्यात भाजपाला यश आले. काँग्रेस, आपमध्ये त्यांचे विभाजन झाले. तर काही मुस्लिम मतदारांनी भाजपाची साथ दिली.
काँग्रेसला वाली कोण ?
आकड्यांनुसार, 70 सदस्य असलेल्या विधानसभेत भाजपाने 47 हून अधिक जागी मुसंडी मारली आहे. तर आप 23 जागांवर आपटले आहे. त्यामुळे आप विरोधी गोटात बसणार आहे. काँग्रेसचं पानीपत झाले आहे. दिल्लीत कधीकाळी मुख्यमंत्री असणाऱ्या या राष्ट्रीय पक्षाचे साधं खातं ही न उघडणं ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे. काँग्रेस अस्ताकडे तर चालली नाही ना? अशी चर्चा होत आहे. भाजपाची स्ट्रॅटर्जीला मात देण्यासाठी या पक्षाकडे करिष्माई नेता नाही का? धोरणं नाहीत का? पार्टी कॅडर नाही का? असे एक ना अनेक प्रश्नांची मालिकाच समोर येत आहे. काँग्रेस अजून किती रसातळाला जाणार असा सवाल पक्षातील कार्यकर्तेच उद्गिनतेने विचारत आहेत.