Delhi News : अल्पवयीन पत्नीसोबत शारीरिक संबंध बलात्कार नाही, हायकोर्टाकडून पतीची निर्दोष मुक्तता
एका बलात्कार प्रकरणातील खटल्यावर दिल्ली हायकोर्टाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप तिच्याच पतीवर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी दिल्ली हायकोर्टात खटला सुरु होता.
नवी दिल्ली / 23 ऑगस्ट 2023 : अल्पवयीन पत्नी आणि प्रौढ पती यांच्यातील वैवाहिक संबंधातील ताटातूट अखेर संपली आहे. मुलगी अल्पवयीन असल्याच्या कारणातून सासूने जावयाला धडा शिकवण्यासाठी कायदेशीर लढाई सुरु केली. मात्र तिचा हा डाव हायकोर्टाने उधळून लावला. मुलगी अल्पवयीन असली तरी तिने मर्जीने लग्न केले होते. यामुळे अल्पवयीन पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवणे बलात्कार नाही, असा निष्कर्ष काढत हायकोर्टाने पतीची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीत 15 वर्षाच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून गरोदर केल्याप्रकरणी मुलीच्या न्यायासाठी कोर्टात धाव घेतली होती. या खटल्यावर दिल्ली हायकोर्टाने निर्णय सुनावत आरोपीची निर्दोष मुक्तता केली. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
काय म्हणाले न्यायालय?
15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी शारिरीक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या पतीला उच्च न्यायालयाने निर्दोष सोडले. मुलगी अल्पवयीन असली तरी तिचे आरोपीशी लग्न झाले होते. लग्नानंतरच दोघांनी शारिरीक संबंध ठेवल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे अल्पवयीन पत्नीशी प्रस्थापित केलेल्या शारिरीक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही. दोघांचा विवाह झाल्याचे विचारात घेता त्यांच्यातील संबंध बलात्कार म्हणताच येणार नाही.
तसेच अशा प्रकरणात मुलगी अल्पवयीन असली तरी तिने स्वतःच्या मर्जीने लग्न केले आणि लग्नानंतर संबंध ठेवले आहेत. त्यामुळे या प्रकरणात पोक्सो कायद्याच्या कलम 5(1) आणि कलम 6 अन्वये गुन्ह्याची तरतूद लागू होत नाही, असे निरीक्षण नोंदवत दिल्ली उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. सत्र न्यायालयाने मुलीचा जबाब ग्राह्य धरत आरोपी पतीचे बलात्काराच्या आरोपातून निर्दोष सुटका केली होती.