Corona in New Delhi : दिल्लीत कोरोना पुन्हा जीवघेणा; 24 तासांत दोघांचा मृत्यू, महाराष्ट्रात काय स्थिती?
दिल्लीतील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालये अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहेत. खाटा वाढविण्यावर भर देण्यात येत असून लसीकरण मोहीमही वेगवान करण्यात येत आहे. रुग्णालयांमध्ये 65 हजार अतिरिक्त खाटा वाढविण्यावर भर देण्यात आल्याचे वृत्त आहे.
नवी दिल्ली : देशात काही दिवसांपासून पुन्हा कोरोना (Corona) डोके वर काढताना दिसत आहे. देशातील अनेक राज्यात कोरोनाचे रूग्न वाढताना दिसत आहेत. तर वाढत्याबाधितांमुळे अनेक राज्यांनी कोरोनाचे नियम पुन्हा लागू केले आहेत. तर रेल्वे प्रशासनानेही कोरोनाचा धोका विचारात घेऊन प्रवासादरम्यान मास्क अनिवार्य (Mask Mandatory) केला आहे. याचदरम्यान देशाची राजधानीत कोरोना सुसाट झाल्याने नागरिक हैराण झाले आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाची प्रकरणे (Corona Patients) झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी अद्ययावत केलेल्या आकडेवारीनुसार, एका दिवसात 2,827 नवीन कोरानाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरानाबाधितांची संख्या ही 4,31,13,413 वर पोहोचली, तर पॉझिटिव्ह केसेस 19,067 वर पोहोचली आहेत. याचदरम्यान नवीन 24 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये केरळमधील 17, उत्तर प्रदेशातील दोन आणि दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या 24 बाधितांचा मृत्यू बरोबरच देशात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा हा 5,24,181 झाला. देशात आतापर्यंत एकूण 5,24,181 मृत्यूची नोंद झाली आहे. ज्यात महाराष्ट्रातील 1,47,850, केरळमधील 69,342, कर्नाटकातील 40,105, तामिळनाडूमधून 38,025, दिल्लीतील 26,184, उत्तर प्रदेश, 23,513 आणि पश्चिम बंगालमधील 23,513 जनांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात मंगळवारी दोन तर गुरुवारी एकाचा मृत्यू
महाराष्ट्राचा विचार केल्यास मंगळवारी 223 कोविड-19 प्रकरणांची नोंद झाली होती. तर दोघांचा मृत्यूही झाला होता. त्यावेळी राज्यात बाधितांची एकूण संख्या ही 78,79,622 झाली होती तर एकूण मृत्यूची संख्या 1,47,849 वर गेली होती, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले होते. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारी प्रमाणे महाराष्ट्रात एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यात कोरोनाचा आलेख हा सध्यातरी नियंत्रणात असून आरोग्य यंत्रणा सतर्क आहे.
500 रुपयांचा दंड
दरम्यान कालही दिल्लीत 965 कोरोनाचे रूग्न दाखल झाले होते. तर एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. दिल्ली सरकार निश्चितपणे सांगत आहे की, घाबरण्याची गरज नाही आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. परंतु वाढत्या प्रकरणांमुळे राजधानीत निर्बंध पुन्हा सुरू झाले आहेत. मेट्रो आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. तसे न केल्यास 500 रुपयांचा दंडही जाहीर करण्यात आला आहे.
शाळांबाबत नवीन मार्गदर्शक सूचना
शाळांबाबत नवीन मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आली आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला लागण झाल्याचे निदर्शनास आल्यास शाळेची ती शाखा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर गरज भासल्यास शाळा प्रशासन संपूर्ण शाळा बंद ठेवण्याचे निर्देश देऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे. सध्या दिल्ली सरकारने वाढत्या बाधितांमुळे शाळा बंद करण्याबाबत काहीही बोललेलं नाही. दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या, आता पुन्हा बंद करून काही फायदा नाही, असेही डॉक्टरांचे मत आहे.
रुग्णालये अलर्ट मोडवर
तसे, दिल्लीतील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालये अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहेत. खाटा वाढविण्यावर भर देण्यात येत असून लसीकरण मोहीमही वेगवान करण्यात येत आहे. रुग्णालयांमध्ये 65 हजार अतिरिक्त खाटा वाढविण्यावर भर देण्यात आल्याचे वृत्त आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये लसीचा बूस्टर डोसही मोफत देण्याची तयारी आहे.
सध्या दिल्लीशिवाय उत्तर प्रदेश, हरियाणा, मिझोराम या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. बीएचयूच्या अहवालात या ट्रेंडवर बरेच काही सांगितले आहे. त्या अहवालानुसार, 30% लोकांमध्ये संकरित प्रतिकारशक्ती संपली आहे, आणि ती नंतर 70% पर्यंत संपेल. त्याचबरोबर कोरोनाच्या नव्या लाटेबाबत अहवालात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मात्र अहवालानुसार, चौथी लाट घातक किंवा फार मोठी असणार नाही.