नवी दिल्लीः महापालिका निवडणुकीत दिल्लीतील (Delhi Municipal corpotaion) आम आदमी पार्टीने (Aam Admi Party) मोठ्या कष्टाने बहुमत मिळवले. मात्र महापौर (Mayor) आणि उपमहापौर पदावर ऐनवळी भाजपाने दावा केल्याने दिल्लीतल्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय. काल महापौर पदाच्या नामांकनासाठी शेवटचा दिवस होता. भाजपच्या वतीने रेखा गुप्ता यांनी महापौर पदासाठी नामांकन अर्ज भरला आहे.
250 सदस्यांच्या दिल्ली महापालिका अर्थात MCD मध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या. यंदा प्रथमच 15 वर्षांची महापालिकेवरची भाजपची सत्ता धुडकावत आम आदमी पार्टीने विजय मिळवला.
आपचे 250 पैकी 134 वॉर्डांमध्ये नगरसेवक जिंकून आले. तर भाजपाने 104 वॉर्डांमध्ये विजय मिळवला. काँग्रेसने 9 जागा तर अपक्षांनी दोन जागा जिंकल्या. गजेंद्र दराल या नगरसेवकाने भाजपात प्रवेश घेतला.
येत्या 6 जानेवारीला महापौर पदावर कोण विराजमान होणार याचा निर्णय लागेल. भाजपाच्या नगरसेविका रेखा गुप्ता यांनी महापौर पदासाठी नामांकन अर्ज दाखल केलाय तर कमल बागडी यांनी उपमहापौर पदासाठी नामांकन अर्ज दाखल केलाय.
महापौर पदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नाही. त्यामुळे येत्या काळात घोडेबाजाराची दाट शक्यता आहे.
दिल्लीच्या महापौर निवडणुकीत 250 निवनिर्वाचित नगरसेवक, दिल्लीचे सात लोकसभा खासदार, तीन राज्यसभा खासदार तसेच विधानसभेचे 14 आमदार हे मतदान करतात.
महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाचा एक तर आपच्या 13 नगरसेवकांनी नामांकन अर्ज दाखल केलाय. आपने महापौर पदासाठी शैली ओबेरॉय आणि उपमहापौरपदासाठी मोहम्मद इकबाल यांचा नामांकन अर्ज दाखल केलाय.
महापौर पद मिळवण्यासाठी एकूण 274जणांचं मतदान होईल. त्यापैकी 138 आकडा गाठणं बंधनकारक आहे.