दिल्ली ते मुंबई प्रवास आता केवळ 12 तासांत, येत्या फेब्रुवारीपर्यंत एक्सप्रेस-वे तयार होणार – नितीन गडकरी
मुंबई ते दिल्ली एक्सप्रेस-वे हा 1,350 किमी लांबीचा आठ पदरी ( 12 लेन पर्यंत विस्तार ) एक्सेस कंट्रोल महामार्ग आहे. त्याचे भूमिपूजन 8 मार्च 2019 रोजी करण्यात आले होते.
नवी दिल्ली | 19 ऑगस्ट 2023 : दिल्ली ते मुंबई या दोन मेट्रो शहरांना जोडणाऱ्या मुंबई ते दिल्ली एक्सप्रेस-वे पुढील वर्षा फेब्रुवारी – 2024 बांधून तयार होणार आहे. त्यामुळे मुंबई – दिल्ली या दोन महानगरातील प्रवासाचे अंतर कमी होत ते अवघ्या 12 तासांवर येणार असल्याची माहीती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले. देशात रस्त्याचे जाळे उभारण्याचे काम वेगात होत असून आम्ही सुरत ते नाशिक नवीन ग्रीन हायवे बांधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एका खाजगी वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस-वे चे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ते पूर्ण होणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत हा मार्ग वाहतूकीसाठी खुला केला जाईल असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील रोड नेटवर्कच्या जाळ्याबद्दल माहीती दिली. आपल्या देशात 65 लाख किलोमीटरचे रस्त्याचे नेटवर्क आहे. आम्ही कश्मीर ते कन्याकूमारी रस्त्याचे जाळे उभारत आहोत. आम्ही प्रत्येक हायवे आणि एक्सप्रेस-वे उभारण्यात पैशांची बचत करीत आहोत. एकट्या राजधानी दिल्लीत 65,000 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरु असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
नितीन गडकरी यांनी सांगितले की पिथोरागड ते मानसरोवर येथील रोड विस्तारीकरणाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. पंजाबातील अमृतसर ते गुजरात येथील भावनगर महामार्गांचा प्रकल्प खूप मोठा आहे. हा रोड मनाली येथून सुरु होईल आणि त्यात पाच बोगदे असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरत ते नाशिक नवीन ग्रीन हायवे
आम्ही सुरत ते नाशिक नवीन ग्रीन हायवे बांधत आहोत. नाशिक ते अहमदनगर आणि तेथून सोलापूर हा मार्ग बांधण्याची योजना आहे. आम्ही म्यानमार, बांग्लादेश आणि भूतान रस्ते बांधत आहोत. आम्ही नेपाळसाठी रस्ते बांधत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ईलेक्ट्रीक वाहनासंदर्भात नितीन गडकरी यांनी सांगितले की जर तुम्ही पेट्रोल आणि डीझेल गाड्यांसाठी महिन्याला जर 30 हजार खर्च करीत असाल तर इलेक्ट्रीक वाहनांसाठी केवळ 2,000 रुपये खर्च येईल. येत्या काही दिवसांत इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती कमी होतील असेही ते म्हणाले.