नवी दिल्लीः दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 8 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. सीबीआयकडून त्यांना आता सोमवारी सकाळी न्यायालयात हजर केले जाणार आहे. सीबीआयने रविवारी सिसोदिया यांना चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले होते आणि त्याचवेळी त्यांना अटक होण्याचीही भीती व्यक्त केली जात होती. सिसोदिया यांना अटक झाल्यामुळे आता ते 7 ते 8 महिने आता तुरुंगातच जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया हे दोन नंबरचे नेते आहेत. पक्षाची रणनीतीकारांपैकीही त्यांचे महत्वाचे स्थान आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर दिल्ली सरकारमधील ते दोन नंबरचे सर्वात शक्तिशाली नेते होते.
मात्र आता त्यांना अटक झाल्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. सिसोदिया यांच्या अटकेमुळे आम आदमी पार्टीपासून सरकारच्याही अडचणी वाढल्या आहेत. मंत्री सत्येंद्र जैन हेही आधीच तुरुंगात गेल्याने अरविंद केजरीवाल यांच्यासमोरील राजकीय आव्हाने वाढली आहेत.
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारच्या सुमारे 18 मंत्रालयांची जबाबदारी आहे, ज्यामध्ये शिक्षण, नियोजन, रोजगार, सार्वजनिक बांधकाम (PWD), पर्यटन, उद्योग, वीज, शहरी विकास, पाणी यासारख्या खात्यांचा समावेश आहे.
सत्येंद्र जैन तुरुंगात गेल्यानंतर मनीष सिसोदिया हे आरोग्य खातेही सांभाळत होते. सिसोदिया यांच्या अटकेनंतर केजरीवाल सरकारच्या दीड डझन खात्यांवर आता याचा परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी ही प्रचंड चिंतेची बाब आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोणतेही खाते स्वत:कडे ठेवलेले नाही. मनीष सिसोदिया हेच दिल्ली सरकारच्या सर्व कामकाजाची जबाबदारीही सांभाळत होते. त्यांच्या अटकेनंतर केजरीवाल सरकारच्या विकासकामांवर परिणाम होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
दिल्ली सरकारची सर्व महत्त्वाची मंत्रालये मनीष सिसोदिया यांच्याकडे आहेत आणि त्यांची अटकही बोर्डाच्या परीक्षा सुरू असतानाच झाल्यामुळे त्या संदर्भातील समस्या वाढणार आहेत.
त्यामुळे दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाच्या कामांवर परिणाम होणार आहेत. एवढेच नाही तर आरोग्य, वीज, पीडब्ल्यूडी यांसारखी महत्त्वाची खातीही त्यांच्याकडे आहेत, ज्यातून दिल्लीचे विकास मॉडेल तयार झाले असल्यामुळे आता आपच्या सरकारकडे असा चेहराच नसल्याने आप अडचणीत येणार असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आम आदमी पार्टी आणि दिल्ली सरकारचा चेहरा असले तरी मनीष सिसोदिया यांचे स्थानही काही कमी नाही.
मनीष सिसोदिया हे पक्ष स्थापनेपासून दिल्ली सरकारच्या कामकाजापर्यंत अरविंद केजरीवाल यांच्या सर्वात विश्वासू साथीदार त्यांना मानले जात आहे.