अचानक अयोध्येत का आले?; लखनऊला पोहोचताच देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. आज दुपारी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर फडणवीस दिल्लीला जाणार आहेत.
लखनऊ : रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लखनऊला आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते आता अयोध्येला जाणार आहेत. अयोध्या दौरा शिवसेनेचा होता. तरीही भाजप नेते या दौऱ्यात सामील झाले. खासकरून देवेंद्र फडणवीसही अयोध्या दौऱ्याला आले आहेत. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस अचानक अयोध्येला का आले? अशी चर्चा रंगलेली असतानाच खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिलं आहे. लखनऊला पोहोचताच त्यांनी आलं येण्याचं कारण सांगितलं आहे. या भूमीशी माझं नातं आहे. या ठिकाणच्या अनेक आठवणी आहेत. रामलल्लाचं दर्शन घेण्याची इच्छा होती म्हणून मी आलोय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मला अतिशय आनंद आहे की रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी येता आलं. खूप दिवसाची इच्छा होती. आज आमच्या सेंट्रल इलेक्शन कमिटीची मिटिंगही होती. तरी देखील मी हा विचार केला की दर्शन घेऊन मग दिल्ली जाऊया. कारण राम जन्मभूमीच्या आंदोलनाशी मी जोडलेलो होतो. प्रत्येक कारसेवेला मी हजर होतो. या भूमीशी माझ्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत. त्यामुळे मला मनापासून आनंद होतोय की आज या ठिकाणी मला येता आलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
रामाचं दर्शन घेतलं पाहिजे
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं आहे. त्यांचं कामच आहे टीका करणं. त्यांना कदाचित अस्था नसेल. आम्हाला अस्था आहे. राज्यकारभार कसा असावा हे प्रभू श्रीरामाने सांगितलं आहे. गांधींजींची संकल्पना रामराज्याची होती. रामराज्याची संकल्पना राबवायची असेल तर रामाचं दर्शन घेतलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
हे हिंदू राष्ट्र आहे
वीर सावरकरांची हिंदू राष्ट्राची संकल्पना मला मान्य नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं. त्यावरही फडणवीस बोलले. शरद पवार काय म्हणतात त्याच्यााशी घेणंदेणं नाही. आम्हाला सावरकरांचं हिंदुत्व मान्य आहे. शेवटी भारतात बहुसंख्य हिंदू राहतात. तुम्ही त्याला हिंदू राष्ट्र म्हणा की म्हणू नका हे हिंदूराष्ट्र आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आमची नैसर्गिक युती
शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपची युती 100 टक्के नैसर्गिक युती आहे. बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना पाहायला मिळत आहे. वारसा जन्माने नाही तर कर्माने मिळतो हे शिंदे यांनी दाखवून दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. तसेच माझं ट्विट वाचलं तर 35 वर्ष शरद पवार साहेब काँग्रेस सोबत आहे. ज्या खालच्या स्तरावर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचा उल्लेख केला आहे. त्यांची संभावना केली आहे ते योग्य नाही एवढंच मी सांगितलं, असंही ते म्हणाले.