अयोध्या | 20 जानेवारी 2024 : प्रभू श्रीराम लंकेवर विजय मिळवून आले तेव्हा अयोध्येत दिवाळी साजरी करण्यात आली होती. अयोध्या आणि श्रीराम यांच्याबाबत रामभक्तांच्या मनात असलेला आदर आणि नातं हे शब्दांमध्ये सांगता येणार नाही इतकं ते श्रेष्ठ आहे. अयोध्येतील राम मंदिर पाडण्यात आलं, पण रामभक्तांच्या मनातून प्रभू श्रीराम कधीच गेले नाहीत. याउलट त्यांच्या मनात श्रीरामांबद्दलची आस्था आणखी जास्त वाढली. प्रभू श्रीरामांचं पुन्हा भव्य असं मंदिर अयोध्येत आता बांधण्यात आलं आहे. संपू्र्ण तयारी झाली आहे. मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीरामांची मूर्ती आणण्यात आली आहे. सर्व पूजा, विधी सुरु आहे. येत्या 22 जानेवारीला अतिशय महत्त्वाची पूजा पार पडणार आहे आणि लगेच रामभक्तांना दर्शनासाठी मंदिर खुलं होणार आहे. राम मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा अतिशय भव्यदिव्य साजरा करण्याचा प्रयत्न केला जातोय. या कार्यक्रमासाठी जगभरातील रामभक्त अयोध्येत दाखल होत आहेत. विशेष म्हणजे विदेशातील आलेल्या रामभक्तांनी अयोध्येत सर्वांना आकर्षित केल्याचं बघायला मिळत आहे.
संपूर्ण राम मंदिर फुलांनी सजवलं आहे. लाखो भक्त अयोध्येत दाखल होत आहेत. भाविकांकडून जय श्रीरामचा जयघोष अयोध्येत केला जातोय. विदेशातूनही भक्त आले आहेत. अमेरिका आणि वेगवेगळ्या देशाचे नागरीक या ठिकाणी आले आहेत. एस्कॉनची पदयात्रा ही दिल्लीवरुन निघाली होती आणि ती आज अयोध्येत दाखल झाली आहे. हे भक्त भजन-कीर्तनात तल्लीन झाले आहेत. राम मंदिर कॉरिडोअरच्या परिसरात एस्कॉनची पदयात्रा दाखल झाली तेव्हा मोठा जल्लोष करण्यात आला. अमेरिकेहून आलेले रामभक्त श्रीकृष्ण चैतन्य स्वामी हे भाविकांसोबत रामलल्लांच्या भजनात तल्लीन झाले. त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.
“हरे कृष्णा! जय श्रीराम! माझं नाव श्रीकृष्ण चैतन्य स्वामी आहे. मी अमेरिकेहून आलोय. आम्ही एस्कॉन आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण संघाचे आहोत. श्रीरामचंद्र भगवान खूप अद्भूत आहेत. आमचा भगवान, आमचा राम, जय श्रीराम”, अशी प्रतिक्रिया अमेरिकेहून आलेले श्रीकृष्ण चैतन्य स्वामी यांनी दिली. चैतन्य स्वामी हातात माईक घेऊन श्रीरामांचं भजन गात आहेत. त्यांच्यापाठी इतर विदेशी रामभक्त नाचत आहेत. चैतन्य स्वामी हे सुद्धा भजन गाताना नृत्य करत आहेत. या विदेशी रामभक्तांसोबत देशातील रामभक्त देखील नृत्य करत आहेत. चैतन्य स्वामींच्या भजनात भारतीय रामभक्तसुद्धा तल्लीन होताना दिसत आहेत.
अयोध्येत अतिशय भक्तिमय असं वातावरण बघायला मिळत आहे. संपूर्ण अयोध्यानगरी सजवण्यात आली आहे. लाखो भाविक अयोध्येत दाखल होत आहेत. भाविकांकडून श्रीरामांचं भाजन गायलं जात आहे. अनेकजण भजनात तल्लीन होऊन नृत्य देखील करत आहेत. तर प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे. संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आलं आहे. येत्या 22 जानेवारीला मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी प्रचंड तयारी आणि लगबग सुरु आहे.