नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir Breaking News) हेमंत लोहिया (IPS Hemant Lohia) नावाच्या एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या (JK Murder News) करण्यात आली आहे. हेमंत लोहिया हे जम्मू काश्मिरात जेलचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. इतकंच नाही, तर त्यांच्या डोक्यावर चादर आणि उशा टाकून जाळून टाकण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आलीय. आजपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्याआधीच जम्मू काश्मीरमध्ये घडलेल्या या घटनेनं सगळी पोलीस यंत्रणाच हादरुन गेलीय.
हेमंत लोहिया हे डायरेक्टर जनरल ऑफ प्रिजन्स अर्थात जेलचे डीजी म्हणून कार्यरत होते. सोमवारी त्यांची हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह आता पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आलाय.
ज्या मित्राच्या घरात हेमंत लोहिया राहत होते, त्याच घरातच त्यांची हत्या करण्यात आली. घरातील नोकराने लोहिया यांचा खून केला असण्याची शंका व्यक्त केली जातेय. संशयास्पद अवस्थेत त्यांचा मृतदेह घरात आढळून आला होता.
दरम्यान, लोहिया यांच्या हत्येच्या 10 तासानंतर टीआरएफ म्हणजे दी रेजिस्टेन्स फ्रन्ट या अतिरेकी संघटनेनं या हत्येची जबाबदारी घेतली आहे, अशी माहितीही समोर आलीय. टीआरएफने सोशल मीडियातून या हत्येची जबाबदारी घेतल्याची भूमिका स्पष्ट केलीय.
लोहिया यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असलेला नोकर सध्या फरार आहे. त्याचा कसून शोध घेतला जातोय. हेमंत लोहिया हे 1992च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होती. ऑगस्ट महिन्यातच डीजी जेल या पदाची त्यांनी जबाबदारी घेतली होती. दरम्यान, त्यांची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलीस या अनुषंगाने पुढील तपास करत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याआधी एका बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येनं संपूर्ण यंत्रणाच हादरुन गेलीय. या हत्येनंतर आता जम्मू काश्मिरात बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय. तसंच केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा यंत्रणाही तैनात करण्यात आलीय.
दरम्यान, सोमवारी लोहिया यांच्या हस्तेआधी सोमवारी एका बँक मॅनेजरवरही हल्ला करण्यात आला होता. अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारातून बँक मॅनेजर अगदी थोडक्यात बचावला होता. आता DG जेल हेमंत लोहिया यांच्या हत्येचा छडा लावण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलंय.