लखनऊ : उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये शेतकरी आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात भयंकर हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. या हाणामारीत शेतकरी जखमी झाले आहेत. राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मुजफ्फरनगरच्या शाहपूर पोलीस ठाणे हद्दतील सोरम गावात हा सर्व प्रकार घडला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रकरण निवळलं आहे (Dispute between BJP workers and farmers in Muzaffarnagar).
नेमकं काय घडलं?
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला देशभरातील अनेक शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, तरीही केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेण्यास तयार नाही. याउलट शेतकऱ्यांमध्ये नव्या कृषी कायद्यांबाबत जागृती व्हावी म्हणून भाजपचे कार्यकर्ते गावोगावी फिरुन शेतकऱ्यांना कृषी कायद्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भाजपच्या या मोहिमेला शेतकऱ्यांकडून विरोध होत असल्याचं दिसत आहे.
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये शेतकरी आणि भाजप कार्यकर्ते थेट आमनेसामने आले. दोघांमध्ये टोकाचा वाद झाला आणि या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. या हाणामारीत बरेच लोक जखमी झाले आहेत. या घटनेबाबत जयंत चौधरी यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे (Dispute between BJP workers and farmers in Muzaffarnagar).
जयंत चौधरी नेमकं काय म्हणाले?
“सोरम गावात भाजप कार्यकर्ते आणि शेतकरी यांच्यात संघर्ष झाला. अनेक लोक जखमी झाले. शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेत नाही, तर निदान त्यांना चांगली वागणूक तर द्या. शेतकऱ्यांची निदान थोडी इज्जत ठेवा. शेतकरी कायद्यांचे फायदे सांगायला जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या गुंडागर्दीला गावकरी सहन करतील?”, जयंत चौधरी म्हणाले आहेत.
सोरम गाँव में बीजेपी नेताओं और किसानों के बीच संघर्ष, कई लोग घायल! किसान के पक्ष में बात नहीं होती तो कम से कम, व्यवहार तो अच्छा रखो। किसान की इज़्ज़त तो करो! इब कानूनों के फायदे बताने जा रहे सरकार के नुमाइंदों की गुंडागर्दी बर्दाश्त करेंगे गाँववाले?#मुजफ्फरनगर pic.twitter.com/X21oP7iTgP
— Jayant Chaudhary (@jayantrld) February 22, 2021
जयंत चौधरी यांनी जखमी शेतकऱ्यांचे फोटो देखील शेअर केले आहेत. या झटापटीत अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्हा बाजूच्या लोकांची समजूत काढली.
शामली येथे केंद्रीय मंत्र्यांना विरोध
नव्या कृषी कायद्यांचं महत्त्व पटवून देण्यासाठी केंद्रीय मंत्री संजीव बालियान काल उत्तर प्रदेशच्या शामली येथे गेले होते. यावेळी त्यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. अनेकांनी त्यांना गावात देखील घुसू दिलं नव्हतं. अनेकांनी त्यांच्याविरोधात नारे दिले होते.
हेही वाचा : Rekha Jare Murder : बाळ बोठेच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा, कोर्टाने अर्ज फेटाळला