बॉर्डर फेंसिंगवरून भारत-बांग्लादेश आमनेसामने! तणाव वाढण्याचं कारण काय? जाणून घ्या
बांगलादेशमधून होणारी अवैध घुसखोरी भारताचं टेन्शन वाढवणारी आहे. गेल्या काही वर्षात अशी बरीच घुसखोरी झाल्याने भारताचं आर्थिक आणि बरंच नुकसान होत आहे. असं असताना भारताने सीमेवर फेसिंग करण्याचा प्रयत्न करत होता. यावर बांग्लादेश आक्षेप नोंदवला आहे.
बांगलादेशमधून होणारी घुसखोरी हे भारताचं डोकेदुखीचं कारण ठरलं आहे. गेल्या काही वर्षात भारत अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींमुळे बरंच काही बिघडल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने अवैधरित्या भारतात राहणाऱ्या बांगलादेशींविरुद्ध दंड थोपाटलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीत तर हा प्रश्न तापला होता. आसाम सरकारनेही बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा वारंवार उचलला आहे. इतकंच काय तर देशात ठिकठिकाणाहून बांगलादेशी घुसखोरांची धरपकड सुरु आहे. असं असताना भारत आणि बांग्लादेश सीमेवरील फेसिंगवरून तणाव वाढला आहे. फेसिंगच्या मुद्द्यावरून बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ढाक्यातील भातीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना बोलवल्याने या वादाला फोडणी मिळाली आहे. जवळपास अर्धा तास चाललेल्या या बैठकीत बांगलादेशचे विदेश सचिव मोहम्मद जशीम उद्दीनने बॉर्डर फेंसिंगबाबत चिंता व्यक्त केली आहे. बांग्लादेशने आरोप केला आहे की, भारत दोन्ही देशांच्या पाच ठिकाणी फेंसिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही देशातील कराराचं उल्लंघन आहे. चला जाणून घेऊयात यामागे नेमकं कारण काय ते
भारत आणि बांग्लादेश यांच्यात 4156 किमी लांबीची सीमा आहे. ही सीमा भारतातील पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांनी सामायिक केली आहे. भारताने आतापर्यंत 3271 किमी सीमेवर काटेरी कुंपण घातलं आहे. बांग्लादेश सरकारच्या मते, अजून 885 किमी फेंसिंग बाकी आहे. 2010 ते 2023 दरम्यान 160 जागी फेसिंगवरून वाद झाला आहे. चपाईनवाबगंज, नौगांव, लालमोनिरहाट आणि तीन बीघा कॉरिडोरमध्ये तणाव आहे.त्यामुळेच बांगलादेशने काटेरी तारांच्या कुंपणाला आक्षेप घेतला आहे. बांगलादेशच्या गृह मंत्रालयाचे सल्लागार, लेफ्टनंट जनरल जहांगीर आलमने सांगितलं की, बॉर्डर गार्ड बांग्लादेश आणि स्थानिक लोकांच्या विरोधामुळे भारतीय सैन्य दलाने कुंपण घालण्याच काम थांबवलं आहे. मागील सरकारच्या कार्यकाळात झालेल्या काही करारांमुळे भारत आणि बांगलादेश यांच्यात अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
बांगलादेशने आरोप केला की, भारताने सीमेसंदर्भातील जुन्या कराराचं उल्लंघन केलं आहे. जहांगीर आलम यांनी केलेल्या दाव्यानुसार, 1975च्या करारानुसार झिरो लाईनापासून 150 यार्डात कोणतंही बांधकाम करता येणार नाही. 1974 मध्ये बांगलादेशने बेरुबारी भारताच्या ताब्यात दिलं होतं आणि त्याऐवजी तीन बिघा कॉरिडॉरमध्ये प्रवेश द्यायचं ठरंलं होतं. पण हा कॉरिडॉर भारताने कधीच पूर्णपणे खुला केला नाही. तो फक्त एका तासासाठी खुला केला जातो. 2010 मध्ये पुन्हा करार झाला आणि यात तीन बिघा कॉरिडोर 24 तास खुला राहील असं सांगण्यात आलं आहे. पण याच कराराने भारताला बॉर्डर फेंसिंग करण्याची परवानगी दिलीहोती.
बांगलादेशने या काटेरी कुंपणावर आक्षेप घेत मैत्रिपूर्ण संबंधांवर परिणाम होईल अशी चिंता व्यक्त केली आहे. भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी सांगितलं की, ‘सीमेवर सुरक्षेसाठी कुंपण घालण्यासाठी दोन्ही देशात करार झाला आहे. आमचे सीमा सुरक्षा दल संपर्कात आहेत. लवकरच अंमलबजावणी होईल.’