चंदिगढ | 31 जुलै 2023 : हरियाणाच्या नूंह येथे आज (31 जुलै) दोन गटांमध्ये मोठी झडप झालीय. यामध्ये 2 होमगार्ड्सचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 10 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मेवात जिल्ह्याच्या नूंह येथे शोभायात्रा काढण्यात आली होती. पण यात्रा पुढे जात असताना नांद गावाजवळ एका गटाने ही यात्रा रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही बाजूने झडप झाली. यावेळी दगडफेक देखील झाली. संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. दोन्ही बाजूची लोक आमनेसामने आले. यावेळी यात्रेत सहभागी असलेल्या वाहनांना आग लावण्यात आली.
अतिशय भयानक अशी ही घटना होती. ही घटना पोलिसांना आवरणं देखील कठीण होऊन बसली. शेवटी गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. पण हिंसाचाराचा वणवा पेटला. पुढे हा हिंसाचार सोहनापर्यंत पोहोचला. सोहना येथे अनेक दुकान आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. सोहना बायपास रोडवर दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या सोहनामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल विज यांनी संबंधित घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. “आताच माहिती मिळाली की मेवातमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्ते पोलिसांची परवानगी घेऊन भगवा यात्रा काढत होते. ही यात्रा ननड गावाजवळ पोहोचली तेव्हा दुसऱ्या समुदायाच्या जमावाने दगडफेक करायला सुरुवात केली. यात्रेला रोखण्याचा प्रयत्न केला गेला”, असं गृहमंत्री म्हणाले.
“मेवातचे एसपी सुट्टीवर आहेत. पलवलचे एसपी हे तिथला अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. ते पोलीस फौजेसह मेवात पोहोचत आहेत. मी पोलीस महासंचालकांना याबाबत आदेश दिले आहेत की जास्तीची पोलिसांची कुमक लागत असेल तर घटनास्थळी रवाना करा आणि शांतता स्थापन करण्याचे प्रयत्न करा”, असं अनिल विज यांनी घटनेनंतर सांगितलं होतं.
मेवातमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. जिल्ह्यात बुधवारपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच मोबाईल सेवा देखील बंद करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील अनेक शहरांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी राज्यातील सर्व जनतेला शांतता पाळण्याचं आवाहन केलं. दोषींना कोणत्या परिस्थितीत सोडलं जाणार नाही. त्यांच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले.