कोणत्या मुघल सम्राटाच्या कबरीच्या देखभालीवर सर्वाधिक पैसा खर्च होतो माहितेय का?
औरंगजेबाच्या करबरीसाठी २०२१-२२ वर्षात २,५५,१६० रुपये आणि २०२२-२३ वर्षात २,००,६३६ रुपये खर्च करण्यात आल्याचे एका आरटीआयमध्ये म्हटले आहे. म्हणजे तीन वर्षात जवळपास ६.५० लाख रुपये खर्च केला आहे.

Aurangzeb Tomb Controversy: मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबरीवरुन सध्या वाद सुरु आहे. महाराष्ट्रात असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी काहींनी केली आहे. औरंगजेबासारख्या क्रूर शासकाच्या कबरीच्या देखभालीसाठी सरकारने दरवर्षी मोठा खर्च केल्याचे आरटीआयमध्ये उघड झाले आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी महिन्याला केवळ 250 रुपये देण्यात येतात.
केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीसाठी तीन वर्षांत सुमारे ६.५० लाख रुपये खर्च केल्याचे आयटीआयमध्ये सांगण्यात आले आहे. 2021-22 मध्ये कबरीच्या देखभालीसाठी 2,55,160 रुपये आणि 2022-23 मध्ये 2,00,636 रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्याचबरोबर देशाची शान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी महिन्याला केवळ 250 रुपये दिले जातात. चला जाणून घेऊया कोणत्या मुघल सम्राटाच्या मकबऱ्याच्या देखभालीवर सर्वात जास्त पैसा खर्च होतो…
दरवर्षी देखभाल का केली जाते?
भारतात मुघलांनी बांधलेल्या बहुतेक इमारती पुरातत्व खात्याने जतन केल्या आहेत. या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी एएसआय दरवर्षी मोठा खर्च करतो. यातील अनेक मुघल सम्राटांच्या कबरींचीही एएसआय देखरेख करतात. या कबरी वर्षानुवर्षे जुन्या आहेत. त्यामुळे भेगा दिसताच त्या दुरुस्त करुन आणि रंगरंगोटीचे काम जवळपास दरवर्षी केले जाते. त्यासाठी एएसआयकडून निधी दिला जातो. आग्रा येथील सिकंदरा येथे मुघल सम्राट अकबराची कबर आहे, तर जहांगीरची कबर लाहोरच्या शाहदरा शहरात रावी नदीच्या काठावर आहे. याशिवाय हुमायूंची कबर दिल्लीत आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगरपासून २५ किलोमीटर अंतरावर खुल्ताबाद येथे आहे.
सर्वाधिक खर्च कोणाच्या कबरीसाठी केला जातो?
मुघल सम्राटांच्या कबरींच्या देखभालीवर किती खर्च झाला याची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, एका अंदाजानुसार भारत सरकार ताजमहालच्या संवर्धनावर सर्वाधिक पैसा खर्च करते. याच ठिकाणी मुघल सम्राट शाहजहान आणि मुमताज यांच्या कबर आहेत. ताजमहालच्या संवर्धनासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मागील काही अहवालांवर नजर टाकल्यास, 2015-16 ते 2017-18 दरम्यान ताजमहालच्या संवर्धन आणि पर्यावरण विकास कामासाठी 12.46 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. तसे पाहायला गेले तर इतर मुघल सम्राटांच्या कबरींची देखभाल करण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात.