संसदेत आता ड्रेस वॉर; राहुल गांधी ब्लू टीशर्टमध्ये तर प्रियंका गांधींनी नेसली निळी साडी, आंदोलनाने वेधले जगाचे लक्ष, संसदेसह हिवाळी अधिवेशनात निळे वादळ
Rahul Gandhi-Priyanka Gandhi in Blue : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी या मुद्दावर भाजपाला चांगलेच वेढले आहे. राहुल गांधींनी आज निळ्या रंगाचा टीशर्ट घातला तर प्रियंका गांधी यांनी निळ्या रंगाची साडी नेसली आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सध्या जोरदार गोंधळाचे सत्र सुरू आहे. विरोधकांनी उद्योगपती अदानी मुद्यावरून केंद्र सरकारला घेरले आहे. तर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या वक्तव्यावरून विरोधक चांगलेच तापले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांवर विरोधकांचा कालपासून हल्लाबोल सुरू झाला आहे. तर या वक्तव्याचा निषेध म्हणून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी निळ्या रंगाचे कपड्यात संसदेत दाखल झाले आहेत.
आले निळे वादळ
संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात संसदेत अभूतपूर्व गोंधळ दिसला. सत्ताधारी आणि विरोधक खासदार एकमेकांना भिडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या विधानानंतर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. राजधानी दिल्लीतल्या संसद अधिवेशनात आणि महाराष्ट्रातल्या नागपूर अधिवेशनातही निळे वादळ आले आहे.




ब्लू टी शर्ट- निळी साडी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे निळ्या रंगाचा टीशर्ट घालून संसदेत दाखल झाले तर प्रियंका गांधी यांनी निळ्या रंगाची साडी नेसली आहे. निळा रंग हा आंबेडकर आणि दलित विचारांचे प्रतिक मानण्यात येते. नेमका तोच धागा पकडून आम्ही या समाजाचे प्रतिनिधित्व करत आहोत आणि शाह यांच्या वक्तव्याचा निषेध करत असल्याचा संदेश दोघांनी दिला आहे.
सोनिया गांधी आक्रमक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर एकच वादळ उठलं. यावर प्रियंका गांधी यांनी त्यांची भूमिका मांडली. संसदेत आंबेडकरांचा अपमान करण्यात आला. आता ट्विटर हँडलवर पण काही काही लिहिण्यात येत आहे. या लोकांवर कोण विश्वास ठेवणार? असा सवाल त्यांनी केला. यांनी संविधान बदलण्याचा घाट घातला. आता घटनाकारावरच हे लोक असं बोलत असतील तर कोण विश्वास ठेवणार यांच्यावर, असे त्या म्हणाल्या.
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
काल राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वक्तव्य केले होते. त्यावरून मग देशभरात एकच विरोधाची लाट उसळली. आता इंडिया आघाडीने या वक्तव्याप्रकरणी शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इंडिया आघाडीने आंदोलन पण केले. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज दुपारी 2:00 वाजेपर्यंत तहकूब तर लोकसभा ही दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.