हत्तींना कसली चढली नशा? का झोपले असे ढाराढूर? हत्ती पितात का दारु, लागली की काय दारुची चटक, पाहा नेमकं झालं काय?
सूर्योदय होण्याच्या वेळी ग्रामस्थ दारू बनविण्याच्या भट्टीवर गेले, पाहता तर काय सगळं अस्तावस्थ झालेले. 24 हत्ती झोपलेल्या अवस्थेत होते.
ओडीशा : हत्ती दारू पितात असं तुम्हाला कुणी सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. त्याचे कारणही अगदी तसेच आहे. हत्ती हे जंगली प्राणी आहे, त्यांना कुठून मिळेल दारू ? प्राणी कसेकाय दारू पिऊ शकतात ? असे विविध प्रश्न पडू शकतात आणि त्यामुळे हत्ती दारू पितात याचे तुम्ही खंडन करू शकतात. पण, ओडीशामधील पाटणा परीक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या जंगलात एक आश्चर्यकारण बाब समोर आली आहे. तब्बल 24 हत्ती दारू पिऊन नशेत ढाराढूर झोपले होते. याबाबत ओडीशाच्या वनविभागाने पुष्टी केली नसली तरी गावकऱ्यांनी बघितलेली बाब ऐकून हत्ती दारू पिऊ शकतात हा निष्कर्ष खरा वाटू लागला आहे. ओडीशात पाटणा म्हणून वनविभागाचे परिक्षेत्र आहे. शिलीपाडा नावाच्या गावाजवळ काजूचे जंगल आहे. याच जंगलात आजूबाजूचे नागरिक हे दारू बनवत असतात. महुआ फुलांपासून इथं दारू बनविली जाते. त्यासाठी या जंगलात दारूच्या भट्टया आहेत. त्यासाठी फुलांना पाण्यात टाकून ती आंबवली जातात. मोठ्या भांड्यात ती ठेवलेली असतात.
अशीच मोठी भांडी जंगलात शिलीपाडा येथील ग्रामस्थांनी दारू बनविण्यासाठी ठेवलेली होती, सोबत दारूच्या भट्टया करून ठेवलेल्या होत्या. तिथे कुणीही नसतांना जंगलात फिरत असलेले तब्बल 24 हत्ती गेले होते.
या चोवीस हत्तींनी अक्षरशः कहर केला, भट्टया उद्ध्वस्त केल्या आणि फुंलांना आंबवून ठेवलेले पाणी पिऊन टाकले, गोडसर लागत असल्याने हत्तींनी चांगलाच ताव मारला असावा.
आपल्या सोंडीने सगळं अस्तावस्थ करून तिथेच लोळून घेतले होते, त्यात गमंत म्हणजे त्या फुलांचा आंबवलेल्या पाण्याने हत्तींना नशा चढली असावी, त्यामुळे हत्तीने तिथेच ढाराढूर झोपून घेतले होते.
सूर्योदय होण्याच्या वेळी ग्रामस्थ दारू बनविण्याच्या भट्टीवर गेले, पाहता तर काय सगळं अस्तावस्थ झालेले. 24 हत्ती झोपलेल्या अवस्थेत होते.
ग्रामस्थांनी ही माहिती वनविभागाला दिली, त्यात वनविभागाने येऊन हत्ती झोपलेले पहिले, हत्तीना उठवण्याचे प्रयत्न केले पण हत्ती झोपेतून जागचे हालतही नव्हते. नंतर वन अधिकाऱ्यांना ढोल आणावे लागले, आणि बऱ्याच वेळाने उठले आणि डुलत-डुलत निघून गेले.