Droupadi Murmu Oath Taking Ceremony : 25 जुलैला द्रौपदी मुर्मू घेणार शपथ, 21 तोफांची दिली जाणार सलामी, वाचा…
द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपालदेखील होत्या. 2015 ते 2021 त्या या पदावर कार्यरत होत्या. त्या मूळच्या मयूरभंज, ओडिशा येथील रहिवासी आहेत. नवनिर्वाचित राष्ट्रपती ओडिशातील भाजपा समर्थित बीजेडी सरकारमध्ये मंत्रीही राहिल्या आहेत.
नवी दिल्ली : नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) 25 जुलैरोजी राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. सोमवारी सकाळी 10.15 वाजता देशाच्या सर्वोच्च पदाची त्या शपथ घेणार आहे. मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला आहेत ज्या या पदापर्यंत पोहोचल्या. दिल्लीतील संसद भवन सेंट्रल हॉलमध्ये (Parliament House) हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी राज्यसभेचे अध्यक्ष, पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश, लोकसभेचे अध्यक्ष, केंद्र सरकारचे मंत्री, राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य, केंद्र सरकारचे नागरी आणि लष्करी अधिकारी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. घटनेच्या (Constitution of India) कलम 60 अन्वये नवनिर्वाचित राष्ट्रपतींना देशाच्या सरन्यायाधीशांकडून शपथ दिली जाते. यानंतर त्यांना 21 तोफांची सलामी दिली जाईल आणि त्यानंतर नव्या राष्ट्रपतींचे अभिभाषण असणार आहे.
पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती
अभिभाषणानंतर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील. तिथे त्यांना इंटर-सर्व्हिस गार्डकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल. 21 जुलै रोजी त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. या पदावर पोहोचणाऱ्या त्या देशातील दुसऱ्या महिला तर राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या आदिवासी समाजातील पहिल्या महिला आहेत. 19 जुलै रोजी आमदार आणि खासदारांनी मतदान केले. त्यात त्यांना 64 टक्के मते मिळाली. मुर्मू यांना 6,76,803 मूल्यासह 2,824 मते मिळाली, तर विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना 3,80,177 मूल्यासह 1,877 मते मिळाली. मुर्मू या देशाच्या 15व्या राष्ट्रपती असतील.
मूळच्या ओडिशाच्या रहिवासी
द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपालदेखील होत्या. 2015 ते 2021 त्या या पदावर कार्यरत होत्या. त्या मूळच्या मयूरभंज, ओडिशा येथील रहिवासी आहेत. नवनिर्वाचित राष्ट्रपती ओडिशातील भाजपा समर्थित बीजेडी सरकारमध्ये मंत्रीही राहिल्या आहेत. मुर्मू यांची मुलगी इतिश्री या बँक अधिकारी असून त्यांचे पती गणेश हेमब्रम नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.
संथाळी साडी नेसणार?
भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, की राष्ट्रपतींच्या कुटुंबातील फक्त चार सदस्य शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यात भाऊ, वहिनी, मुलगी आणि जावई असणार आहेत. द्रौपदी मुर्मू शपथविधी समारंभात संथाळी साडी नेसू शकतात. त्यांची वहिनी सुकरी तुडू पूर्व भारतातील महिला वापरत असलेली खास संथाळी साडी घेऊन दिल्लीला रवाना झाल्या आहेत.