इंदूर आणि मध्यप्रदेशच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के, रिस्टर स्केलवर किती मोजली गेली तिव्रता?
इंदूरशिवाय मध्य प्रदेशातील इतर जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे वृत्त आहे. एका माहितीनुसार, बहुतांश ठिकाणी भूकंपाची तीव्रता...
इंदूर : इंदूरमध्ये रविवारी म्हणजेच आज दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. (Earthquake in Indore) रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.4 इतकी नोंदवण्यात आली. अधिकृत माहितीनुसार, त्याचे केंद्र इंदूरपासून 150 किमी अंतरावर असलेल्या धार जिल्ह्यात गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर होते. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 12.54 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. इंदूरशिवाय मध्य प्रदेशातील इतर जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे वृत्त आहे. एका माहितीनुसार, बहुतांश ठिकाणी भूकंपाची तीव्रता 3.0 इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्यप्रदेशच्या या भागातही जाणवले भूकंपाचे धक्के.
बडवणीचे एसडीएम यांनी धार जिल्ह्यातील दही येथे भूकंप झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगीतल्यानुसार बडवणीमध्ये कोणतेही कंपन किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान नाही. त्याचे केंद्र कुक्षीजवळील दही येथे असल्याचे सांगितले जात आहे.
अशा प्रकारे मोजल्या जातो भुकंप
हलका ते जोरदार धक्का अशा स्वरुपात भूकंपाचा धक्का मोजण्यात येतो. धक्का किती क्षमतेचा होता, हे मोजण्यासाठी ‘मॅग्निट्यूड’ ही संज्ञा वापरण्यात येते. त्याचे मापन रिश्टर स्केलवर केले जाते. सहा आणि त्यापुढील ‘मॅग्निट्यूड’चा भूकंप हा मोठा धक्का मानण्यात येतो. त्यामुळे हानी होण्याची शक्यता असते. 2004 मध्ये सुमात्राला बसलेला 9.3 रिश्टर स्केल क्षमतेचा धक्का गेल्या काही दशकांतील सर्वांत मोठा धक्का मानला जातो. भूकंपाचा धक्का बसल्यानंतर त्यातून किती प्रमाणात ऊर्जा उत्सजिर्त होते, त्यावरून त्याचे मोजमाप ठरविले जाते.
वेगवेगळया क्षमतेचे भूकंप मोजण्यासाठी वेगवेगळी परिमाणे वापरण्यात येतात. सहा रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे उत्सर्जित होणारी ऊर्जा ही पाच रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे उत्सर्जित होणा-या ऊर्जेच्या 32 पट अधिक असते. पाच ते सात रिश्टर स्केलच्या धक्क्यांमध्ये मोठा फरक असतो. दिसायला हे केवळ दोन अंकाचे अंतर दिसत असले, सात रिश्टर स्केलचा भूकंप पाचपेक्षा हजार पटीने विध्वंसक असतो.