ईडीची मोठी कारवाई, केरळचे मुख्यमंत्री पिनराई यांच्या मुलीविरोधात गुन्हा दाखल
लोकसभा निवडणूकीचा काळ जसा जवळ येत चालला तसा ईडीचा ससेमिरा सुरुच आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या कन्या वीणा यांच्या कंपनीवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या कंपनीशी संबंधित सर्वांना आता ईडी चौकशीसाठी समन्स धाडणार आहे.
केरळ : लोकसभा निवडणूकांचे बिगुल वाजले असताना ईडी पुन्हा सक्रीय झाली आहे. ईडीने आता केरळचे मुख्यमंत्री पिनराई वियजन यांची कन्या वीणा वियजन यांच्या मालकीची आयटी कंपनी आणि अन्य काही लोकांविरोधात मनी लॉड्रींग ॲक्टद्वारा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात लवकरच वीणा विजयन यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एका खाजगी खनिज फर्मद्वारा वीणा आणि त्यांच्या कंपनीला झालेल्या कथित पैसे दिल्याचे प्रकरण आहे.
ईडीने अलिकडेच दिल्लीचे मु्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. त्यानंतर आता ईडीने बुधवारी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची कन्या वीणा विजयन यांच्या विरोधात मनी लॉड्रींगचे प्रकरण दाखल केले आहे. या प्रकरणात सामील असलेल्या सर्व लोकांना चौकशीसाठी ईडी समन्स पाठवू शकते असे म्हटले जात आहे. कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाची तपास समितीद्वारा ( एसएफआयओ ) दाखल तक्रारी आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयकर विभागाशी संबंध
हे प्रकरण आयकर विभागाशी संबंधित आहे. एका खाजगी कंपनी कोचीन मिनरल्स एण्ड रुटाईल लिमिटेड ( सीएमआरएल ) ने वीणा विजयन यांची आयटी कंपनी एक्सालॉजिक सॉल्युशन्स हीला 1.72 कोटी रुपयांचे बेकायदेशीर पेमेंट करण्यात आले होते. या आयटी फर्मने या कंपनीला कोणतीही सेवा पुरविली नव्हती असे उघडकीस आले आहे. कर्नाटक हायकोर्टाने गेल्या महिन्यात एसएफआयओने सुरू केलेल्या तपासाविरुद्ध एक्सालॉजिक सोल्युशन्सची याचिका फेटाळून लावली होती.
केजरीवाल ईडी कोठडीत
लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नऊ समन्स बजावल्यानंतर अखेर सक्तवसुली संचनालयाने ( ईडी ) अलिकडे 21 मार्च रोजी अटक केली आहे. पीएमएलए कोर्टाने त्यांना दुसऱ्या दिवशीच 28 मार्चपर्यंत रिमांडवर पाठविले आहे. केजरीवाल यांनी आपल्या अटके विरोधात आधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर ही याचिका मागे घेत त्यांना आता दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. केजरीवाल यांच्या आधी झारखंड मुक्ती मोर्चा यांचे नेते हेमंत सोरेन यांना देखील ईडीने अटक केली आहे. ईडीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.