नवी दिल्ली : आज शुक्रवारी पहाटेपासूनच देशातील 40 ठिकाणी ईडीची छापेमारी (ED Raid) सुरु झाली आहे. दिल्ली आणि तेलंगणासहित देशभरातील 40 जागी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. यात पंजाब, तेलंगणा (Telangana), नेल्लोर, चेन्नई (Chennai) आणि दिल्ली एनसीआर परिसरात अधिकाऱ्यांकडून तपासणी आणि चौकशी सुरु आहे. यासह हैदराबादमध्ये 20 ठिकाणी रेड पडली आहे. दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरणातील अनियमितता संबंधित या धाडी असल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वी 6 सप्टेंबर रोजी देशभरात ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. त्यावेळी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, लखनौ आणि गुरुग्राम आदी शहरांमध्ये संबंधितांवर छापेमारी केली होती. दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकारच्या नव्या मद्य धोरणावरून भाजप सरकारने अनेक घोटाळ्यांचे आरोप लावले आहेत.
याविषयी प्राथमिक माहितीनुसार, ईडीने दिल्लीतील नव्या उत्पादन शुल्क धोरणातील अनियमितता झाल्याचा आरोप लावला आहे. या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा संशय असलेल्या ठिकाणी धाड टाकली जात आहे. देशात आज अशा 40 ठिकाणी छापेमारी झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने मद्य क्षेत्रातील माफियांना कोट्यवधी रुपये माफ केल्याचा आरोप भाजपने केला आहे. यामुळे दिल्लीच्या महसूलात तोटा झाल्याचा आरोपही केला जातोय. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. मद्य क्षेत्रातील व्यापाऱ्यांना 30 कोटी रुपयांची सवलत दिल्याचं म्हटलं जातंय. तसेच परवाना धारकांना त्यांच्या मर्जीनुसार एक्सटेंशन देण्यात आल्याचाही आरोप आहे. उत्पादन शुल्कविषयक नियमांचं उल्लंघन करून दिल्लीने हे मद्यविषयक धोरण आखल्याचा भाजपाचा आरोप आहे.