Money Laundering Case : केजरीवालांच्या आरोग्य मंत्र्याचा पाय खोलात, सत्येंद्र जैनांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे, सोन्याची 133 नाणी जप्त
ईडी सत्येंद्र जैन यांना ताब्यात घेऊन चौकशी करत होती. ईडीने कोलकाता येथील एका कंपनीच्या हवाला व्यवहाराप्रकरणी सत्येंद्र जैन यांच्यावर अटकेची कारवाई केली होती.
नवी दिल्ली : दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Health Minister Satyendra Jain) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) अटक करण्यात आलेल्या सत्येंद्र जैनच्या अनेक ठिकाणी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने आज पुन्हा छापे मारले. त्यात त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कॅश (Cash) आणि सोन्याची बिस्कीट मिळाल्याची माहिती मिळत आहे. तर सत्येंद्र जैन यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या प्रकाश ज्वेलर्सच्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 2.23 कोटींची रोकड सापडल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरा सहकारी वैभव जैन याच्याकडे 41.5 लाख रोख 133 सोन्याची नाणी मिळाली. तर जीएस मथारू यांच्याकडे 20 लाखांची रोकड सापडल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून सोमवारी पहाटे कारवाई करण्यात आली. मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरावर ईडीने पहाटे छापे टाकण्यास सुरुवात केली. तसेच मनी लाँड्रिंग प्रकरणी जैन यांच्यासह हवाला ऑपरेटरच्या ठिकाणांवर ईडीचे पथक छापे टाकत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे ईडीने सत्येंद्र जैन यांना 30 मे रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक केली होती. अटकेनंतर सत्येंद्र जैन यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने जैन यांना 9 जूनपर्यंत ईडी कोठडीत पाठवले.
हवाला व्यवहाराप्रकरणी जैन यांच्यावर कारवाई
ईडी सत्येंद्र जैन यांना ताब्यात घेऊन चौकशी करत होती. ईडीने कोलकाता येथील एका कंपनीच्या हवाला व्यवहाराप्रकरणी सत्येंद्र जैन यांच्यावर अटकेची कारवाई केली होती.
सिसोदिया यांनी सांगितले खोटे प्रकरण
दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाने केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सत्येंद्र जैन यांच्यावरील खटला खोटा असल्याचा दावा केला होता आणि काही दिवसांत त्यांची सुटका होईल, असा दावा ही केला होता. तर सत्येंद्र जैन यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या मंत्रिपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे सोपवली आहे.
कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती
यापूर्वी एप्रिलमध्ये, एजन्सीने जैन यांच्या कुटुंबाची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता आणि त्यांच्या मालकीच्या आणि नियंत्रित कंपन्यांची चौकशीचा भाग म्हणून जप्त केली होती. त्यानंतर ईडीने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी पीएमएलए अंतर्गत ‘अकिंचन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडो मेटल इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रयास इन्फोसोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, मंगलायतन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, जेजे आयडियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, वैभव जैन यांची पत्नी स्वाती जैन, अजित प्रसाद ए. जैन यांच्या पत्नी सुशीला जैन आणि सुनील जैन यांच्या पत्नी इंदू जैन यांच्या 4.81 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा हंगामी आदेश जारी करण्यात आला.
2015 आणि 2016 दरम्यान, सत्येंद्र कुमार जैन हे सार्वजनिक सेवक असताना, कोलकाता येथील एंट्री ऑपरेटर्सना हवाला मार्गाने पाठविलेल्या रकमेच्या बदल्यात शेल कंपन्यांकडून त्यांच्या मालकीच्या आणि नियंत्रित कंपन्यांमध्ये 4.81 कोटी रुपयांच्या नोंदी केल्या गेल्याचे तपासात आढळले.