खळबळजनक… EDच्या अधिकाऱ्यांवर 200 जणांचा हल्ला, दिसेल ते फेकून वाहने फोडली
रेशन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक पश्चिम बंगालमध्ये सातत्याने छापे टाकत आहे. याच कारवाईसाठी शुक्रवारी ईडीचे पथक छापे टाकण्यासाठी उत्तर 24 परगणा येथे पोहोचले. मात्र ईडीच्या पथकातील अधिकाऱ्यांवर गावकऱ्यांच्या जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली
कलकत्ता | 5 जानेवारी 2024 : रेशन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक पश्चिम बंगालमध्ये सातत्याने छापे टाकत आहे. याच कारवाईसाठी शुक्रवारी ईडीचे पथक छापे टाकण्यासाठी उत्तर 24 परगणा येथे पोहोचले. मात्र ईडीच्या पथकातील अधिकाऱ्यांवर गावकऱ्यांच्या जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घेराव घालून गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर हल्ला केला. तसेच जमावाने ईडी अधिकाऱ्यांच्या तसेच केंद्रीय सुरक्षा दलाच्या वाहनांची तोडफोडही केली.
ईडीच्या टीमवरील हल्ल्याचे हे प्रकरण उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी गावात घडले रेशन घोटाळ्याप्रकरणी टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचे पथक तेथे पोहोचले. मात्र तेव्हा अचानक 200 लोकांच्या जमावाने ईडीच्या टीमवर अचानक हल्ला केला. जमावाने ईडी अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या वाहनांची तोडफोड केली. मिळालेल्या माहितीनुसार, छापा टाकण्यासाठी आलेल्या टीममध्ये ईडीच्या सहाय्यक संचालकाचाही समावेश होता. जमावाने त्यांची गाडीही फोडत बरीच नासधूस केली
अनेक महिन्यांपासून सुरू आहेत छापे
कथित रेशन वितरण घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांचे छापे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. पश्चिम बंगालमधील लाभार्थ्यांसाठी असलेल्या सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) रेशनपैकी सुमारे 30 टक्के रेशन खुल्या बाजारात पाठवले गेले होते, असे अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वी उघड केले होते . रेशनच्या कथित चोरीनंतर सापडलेले पैसे गिरणी मालक आणि पीडीएस वितरकांमध्ये वाटण्यात आल्याचेही तपास यंत्रणेने म्हटले होते. राईस मिल मालकांनी काही सहकारी संस्थांसह काही लोकांच्या संगनमताने शेतकऱ्यांची बनावट बँक खाती उघडून धान उत्पादकांना देण्यात आलेला एमएसपी स्वत:च्या खिशात घातला. राईस मिलच्या मालकांनी प्रति क्विंटल सुमारे 200 रुपये कमावले होते, असे मुख्य संशयितांपैकी एकाने कबूल केले.
यापूर्वी रेशन घोटाळ्याप्रकरणी बंगालच्या मंत्री ज्योतिप्रिया मलिक यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले होते. वनमंत्री होण्यापूर्वी ज्योतिप्रिया मलिक यांनी अन्नमंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली होती. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने या कथित घोटाळ्यात राईस मिल मालक बाकीबुर रहमान याला अटक केली होती. 2004 मध्ये राईस मिल मालक म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या रहमानने पुढील दोन वर्षांत आणखी तीन कंपन्या स्थापन केल्या.
याआधीही टीएमसी नेत्यांवर ईडीचे छापे पडले आहेत. तपास यंत्रणेने पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचीही भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणात चौकशी केली.