Ed ची काँग्रेसवर कारवाई; 2 आमदारांसह काही नेत्यांच्या घरावर छापा
अधिकारी शिव शंकर नाग आणि संदीप कुमार यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे ९ जणांना अटक करण्यात आली. काँग्रेसच्या दोन आमदारांच्या घरी ही छापेमारी सुरू आहे.
नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांच्या घरी छापेमारी सुरू आहे. काँग्रेसच्या महाअधिवेशनाच्या तयारीत असलेल्या नेत्यांच्या घरी ही छापेमारी करण्यात आली. कोळसा घोटाळ्यात ईडीने १४ ठिकाणी छापे मारले. यात काँग्रेस नेत्यांच्या घरीही छापेमारी करण्यात आली. छापा पडलेल्यांमध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांचा समावेश आहे. तसेच राज्याचे कोषाध्यक्षांचाही समावेश आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता एकावेळी ही छापेमारी करण्यात आली. या छाप्यात सुमारे ८० च्या वर अधिकारी सहभागी आहेत. रायपूरच्या गितांजलीनगर, भिलाई, श्रीरामनगर, पंडरीसह आणखी काही ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे.
पीएमएलए २००२ कायद्यानुसार ही कारवाई केली जात आहे. यापूर्वीही काही घटनांत नेते आणि सराकारी अधिकारी यांच्या घरी छापेमारी झाली आहे. २५ रुपये प्रती टनानुसार कोळसा काढला जात होता, असा आरोप आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे निकटवर्तीय आयएएस अधिकारी सौम्य चौरसिया, राज्यातील आयएएस अधिकारी समीर विश्वोई आणि काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. सध्या उत्खनन अधिकारी शिव शंकर नाग आणि संदीप कुमार यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे ९ जणांना अटक करण्यात आली.
काही दिवसांत काँग्रेसचे महाअधिवेशन
काल संध्याकाळी ईडीच्या टीमने रेकी केली. आज ईडीच्या टीमने छापामारी केली. २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान काँग्रेसचे महाअधिवेशन होणार आहे. त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लीकार्जुन खर्गे यासारखे दिग्गज नेते उपस्थित राहतील. महाअधिवेशनाच्या आधी ही छापेमारी झाली. त्यामुळं राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
भाजप केंद्रीय तपास अधिकाऱ्यांचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला. काँग्रेसच्या अधिवेशनापूर्वी काँग्रेस नेत्यांच्या घरी छापेमारी करण्यात आली.
ईडीच्या छाप्यांनी घाबरणार नाही
ईडीच्या छापेमारीवरून काँग्रेसने मोठा आरोप केला. अधिवेशनात अडथळा आणण्यासाठी केंद्र सरकारने ईडीला पाठवलं. केंद्र सरकार ईडीचा दुरुपयोग करत आहे. आम्ही झुकणार नाही. चांगल्या पद्धतीने अधिवेशन पूर्ण करू, असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला.