गुजरात | 29 सप्टेंबर 2023 : हल्ली तरुण वयातच मुलांना हार्टअटॅक येण्याचे प्रमाण चिंताजनक वाढले आहे. गुजरातच्या सुरत शहरातील एका शाळेत अभ्यास करीत असताना एका आठवीच्या विद्यार्थीनीला हार्टअटॅक आल्याने ती चक्कर येऊन पडली. नंतर शाळेच्या प्रशासनाने तिला नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतू तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. या मुलीचे नाव रिद्धी असून या घटनेनंतर शाळेत सन्नाटा पसरला आहे. रिद्धीच्या मृत्यूनंतर शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे.
सुरतच्या गोडादरा परीसरातील गीतांजली शाळेतील ही घटना आहे. साईबाबा सोसायटीत रहाणारे साड्यांचे व्यापारी मुकेश भाई मेवाडा यांची कन्या रिद्धी या शाळेतील हुशार विद्यार्थीनी आहे. बुधवारी शाळेत नेहमीप्रमाणे वर्ग चालू असताना रिद्धी अचानक बेशुद्ध झाली. रिद्धी क्लासमध्ये बसली होती तेव्हा तिला कसलाही त्रास होत नव्हता. तिने यासंदर्भात कोणतीही तक्रार केली नव्हती. परंतू अचानक ती क्लासमध्ये बेशुद्ध होऊन खाली पडली.
रिद्धी बेशुद्ध पडताच वर्गातील विद्यार्थ्यांनी मदतीसाठी धावा केला. तेव्हा सर्व शिक्षकांनी त्या वर्गात धाव घेतली. सुरुवातीला शिक्षकांनी तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. परंतू काही उपयोग झाल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. परंतू डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. मुलीच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वहात आहेत.
आपल्या मुलीला काही झालेले नव्हते. तिने कधी छातीत दुखणे किंवा हार्टअटॅकच्या कोणत्याही लक्षणाबद्दल काही तक्रार केली नव्हती. शाळेच्या शिक्षकांच्या मते रिद्धी अभ्यासात खूप हुशार होती. नेहमी आनंदी रहाणारी मुलगी होती. एवढ्या कमी वयात तिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याच वर्षी लखनऊच्या सिटी मोंटेसरी शाळेत एका विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. शाळेचे शिक्षण शिकवित असताना मुलगा अभ्यास करीत असताना अचानक जमीनीवर कोसळला. त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा तेथे मृत्यू झाला.