नवी दिल्ली : आसामसह देशातील 4 राज्यांमध्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या म्हणजे एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलंय. मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज (26 फेब्रुवारी) या पाचही राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. त्यामुळे या राज्यांमधील निवडणुकांकडे लक्ष ठेऊन असलेल्यांची प्रतिक्षा संपलीय. आसाममध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. देशातील पाचही राज्यातील निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे. संपूर्ण देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही या पाच राज्यात निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी उपाययोजनांचीही माहिती दिली (Election Commission announce Assam Assembly election 2021 date)
पहिला टप्पा (47 विधानसभा मतदारसंघ)
नोटीस – 2 मार्च
अर्जाचा शेवटचा दिवस – 9 मार्च
अर्ज छाननी – 10 मार्च
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – 12 मार्च
मतदान – 27 मार्च
दुसरा टप्पा (39 विधानसभा मतदारसंघ)
मतदान – 1 एप्रिल
तिसरा टप्पा
मतदान – 6 एप्रिल
निकाल
2 मे 2021 रोजी
सध्या आसाममध्ये भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सत्तेत आहे. 2016 मध्ये झालेल्या आसाम विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. भाजप 60 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला. आसाममध्ये बहुमतासाठी 64 आमदारांची गरज होती. भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने एकूण 86 जागा जिंकल्या. यासह आसाममध्ये 2016 मध्ये एनडीएचं सरकार स्थापन झालं. एका अपक्ष आमदारानेही एनडीएच्या सरकारला पाठिंबा दिला. या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव होत सत्तेतील काँग्रेसच्या आमदारांची संख्या 78 वरुन थेट 26 वर आली. भाजपने 26 वरुन 86 वर मजल मारली.
पक्षीय बलाबल
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) – 86 आमदार
भाजप – 60 आमदार
आसाम गण परिषद – 14 आमदार
बोडोलँड पिपल्स फ्रंट – 12 आमदार
रभा जातीय ऐक्य मंच – 00
तिवा जातीय ऐक्य मंच – 00
संयुक्त पुरोगामी आघाडी
काँग्रसे – 26
युनायटेड पिपल्स पार्डी (लिबरल) – 00
ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट – 13 आमदार
अपक्ष – 01
राजकीय समीकरणे
आसाममध्ये 2016 च्या निडणुकीत एकूण 4 गटांमध्ये निवडणूक झाली होती. यात भाजपच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी तयार झाली. यात आसाम गण परिषद, बोडोलँड पिपल्स फ्रंट, रभा जातीय ऐक्य मंच आणि तिवा जातीय ऐक्य मंचाचा समावेश होता. संयुक्त पुरोगामी आघाडीत काँग्रसे आणि युनायटेड पिपल्स पार्डी (लिबरल) यांचा समावेश होता. डाव्या पक्षांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी देखील युती केली होती. याशिवाय आणखी एक ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटच्या नेतृत्वातही एक आघाडी निवडणूक मैदानात होती.
आसामची 3 कोटी 11 लाख 69 हजार 272 इतकी आहे. यात मतदारांची संख्या जवळपास 2 कोटी होती. मागील निवडणुकीत 84.72 टक्के मतदान झालं होतं. म्हणजेच 1 कोटी 69 लाख 19 हजार 364 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आसाममध्ये 1000 पुरुषांमागे 958 स्त्रीयांची संख्या आहे.
आसाममधील विधानसभा निवडणुकीचा इतिहास
आसामच्या आतापर्यंतच्या निवडणूक इतिहासात 11 पंचवार्षिक म्हणजेच तब्बल 55 वर्षे काँग्रेस सत्तेत होती. मधल्या काळात दोनदा आसाम गण परिषदेनेही सत्ता स्थापन केली. भाजप 2016 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच आसाममध्ये सत्तेवर आलाय. त्याआधी तब्बल 15 वर्षे काँग्रेसचं राज्य होतं.
जातीय समीकरणे
2011 च्या जनगणननेनुसार आसाममध्ये 61.5 टक्के हिंदू, 34.22 मुस्लीम, 3.7 टक्के ख्रिश्चन नागरिक आहेत. अनुसुचित जमातीच्या संख्या जवळपास 13 टक्के आहे. यात प्रामुख्याने बोडो आदिवासी समाजाचा समावेश आहे.
या निवडणुकीतील वादाचा मुद्दा :
केंद्रातील मोदी सरकारने रेटलेल्या NRC आणि CAA कायद्यावरुन आसाममध्ये मोठा गदारोळ झाला होता. अनेक नागरिकांची नावं NRC मध्ये न आल्याने या गटात जोरदार असंतोष पाहायला मिळालाय. याशिवाय आसाममधील पारंपारिक आदिवासी समुहांनी शेजारी देशांमधील नागरिकांना आसाममध्ये नागरिकत्व देण्यास विरोध केलाय. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत नागरिकत्व कायद्याचा मुद्दा किती परिणाम करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांचा बिगूल आज वाजणार; निवडणूक तारखांची घोषणा होण्याची शक्यता
Assembly Election 2021 Date EC LIVE : 5 राज्यात विधानसभेच्या 824 जागांवर मतदान
व्हिडीओ पाहा :
Election Commission announce Assam Assembly election 2021 date