Twitter आता पूर्णपणे एलन मस्क यांच्या मालकीचं! जगभराचं लक्ष लागलेल्या बड्या डीलचा घटनाक्रम, वाचा एका क्लिकवर!
गुरुवारी ट्विटरच्या मुख्यालयात मोठं वॉश बेसिन घेऊन आलेल्या एलन मस्क यांनी मोठे संकेत दिले होते. आज त्याचा अर्थ पूर्णपणे स्पष्ट झाला.
मुंबईः ट्विटर डीलमध्ये अडकलेले एलन मस्क (Elon Musk) यांनी या करारात बाजी मारल्याचं चित्र आहे. ट्विटरवर (Twitter) ते आपल्या अधिकारांचा पूर्णपणे वापर करताना दिसतायत. कालच त्यांनी याचे संकेत दिले होते. ट्विटरच्या मुख्यालयात मोठं वॉश बेसिन घेऊन आले. त्यानंतर ट्विटरमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरु झालंय. टेस्लाचे CEO एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर आता ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल (Parag Agrawal) आणि सीएफओ नेड सेगल यांनी राजीनामा दिलाय.
ट्विटरचे लीगल पॉलिसी प्रमुखांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाउंट बॅन करणारे हेच सल्लागार होते.
एलन मस्क यांनी 4 ऑक्टोबर रोजीच 44 अब्ज डॉलरची डील पूर्ण करण्याचे संकेत दिले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते याच डीलला पूर्णविराम देण्याच्या प्रयत्नात होते. ट्विटर आणि एलन मस्क यांच्या दरम्यान झालेल्या या करारातील टप्पे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. पाहा यातील घटनाक्रम-
कधी काय घडलं?
- 31 जानेवारी– एलन मस्क यांनी ट्विटरमध्ये हळू हळू भागीदारी वाढवायला सुरुवात केली. मार्च महिन्यापर्यंत ही भागीदारी 5 टक्के होती.
- 26 मार्च– मस्क यांनी पहिल्यांदाच ट्विटर खरेदी करण्याचे संकेत दिले. मी फ्री स्पीचचं समर्थन करतो, त्यामुळे ट्विटरला एक पर्याय निर्माण करायचाय, असं ट्विट त्यांनी केलं. यावेळी त्यांनी ट्विटरचे सह संस्थापक जॅक डोर्सी यांचीही भेट घेतली.
- 27 मार्च– शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, मस्क यांनी ट्विटरचे सीईओ आणि बोर्डसदस्यांची भेट घेतली. मस्क यांना बोर्डावर घेण्याची चर्चा झाली. यासोबतच ट्विटरला स्पर्धक निर्माण करू शकतात, असेही संकेत मस्क यांनी दिले.
- 4 एप्रिल– शेअर मार्केटला दिलेल्या माहितीनुसार, 9 टक्के भागीदारी खरेदी करून मस्क हे ट्विटरचे सर्वात मोठे भागीदार बनले. त्यांच्याकडे 3 अब्ज डॉलर्सचे 7.35 कोटी शेअर्स आहेत.
- 5 एप्रिल– मस्क यांना काही अटींसह ट्विटरच्या बोर्ड मेंबर्समध्ये येण्याची ऑफर दिली गेली.
- 9 एप्रिल– एलन मस्क आणि ट्विटरचे सीईओ अग्रवाल यांच्यातील वाद प्रथमच उघडे पडले. दोघांनीही ट्विटच्या माध्यमातून तीव्र सवाल-जवाब नोंदवले.
- 11 एप्रिल– ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी घोषणा केली की एलन मस्क ट्विटर बोर्ड सदस्यांमध्ये सहभागी होणार नाहीत.
- 14 एप्रिल– एलन मस्क यांनी 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर खरेदी करण्याची ऑफर दिली.
- 15 एप्रिल– बळजबरीने टेकओव्हर होण्यापासून वाचण्यासाठी ट्विटरने संरक्षणात्मक धोरण poison pill ची घोषणा केली.
- 21 एप्रिल- मस्क यांनी डीलसाठी 46 अब्ज डॉलर्स जमवले.
- 25 एप्रिल– मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर खरेदी करण्याची डील केली
- 29 एप्रिल– मस्क यांनी या डीलच्या फंडिंगसाठी 8.5 अब्ज डॉलरचे टेस्लाचे शेअर्स विकले.
- 6 जून– बॉट अकाउंटवरील माहितीवरून मस्क यांनी ट्विटरला डील मोडण्याची धमकी दिली.
- 12जुलै– डीलमधून मागे हटण्याप्रकरणी मस्क यांच्याविरोधात ट्विटर कोर्टात गेले. मस्क यांनीही याचिका दाखल केली.
- 19 जुलै– कोर्ट म्हणालं, सुनावणी ऑक्टोबरपासून सुरु होईल.
- 5 ऑक्टोबर– मस्क यांनी पहिलाच प्रस्ताव पुढे नेण्याचं म्हटलं. त्यानंतर ट्विटरनेही करार पूर्ण करण्याचं मान्य केलं.
- 6 ऑक्टोबर– कोर्टाने 28ऑक्टोबरपर्यंत दोन्ही पक्षांना करार पूर्ण करण्याचे आदेश दिले.
- 26 ऑक्टोबर– मस्क यांनी ट्विटरच्या मुख्यालयात मोठं वॉश बेसिन घेऊन आल्याचा व्हिडिओ पोस्ट केला.