यांच्या डोक्यावर काय नेमकं पडणारे? ऑफिसमध्ये असं हेल्मेट घालून का बसतात हे लोक?
हेल्मेट घालून कर्मचारी काम करतानाचा या ऑफिसमधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ऑफिसमध्ये कुणी हेल्मेट घालून बसलेले लोक पाहिले नसतील. पण इथे पाहता येतील. उत्तर प्रदेशातील बागपत येथील वीजपुरवठा विभागाचं हे ऑफिस आहे. इथले ४० कर्मचारी दररोज आठ तासांच्या ड्युटीत हेल्मेट घालूनत काम करतात. हेल्मेट घातलं नाही तर वरतून कधी काय कोसळेल सांगता येत नाही, ही भीती त्यांना असते. कारण या इमारतीची अवस्थाच एवढी जर्जर झालीय की ती इथल्या भिंती आणि छत कधी दगा देईल सांगता येत नाही. अनेकदा तक्रार करूनही सरकारतर्फे कार्यालयाची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे एकदाचं छत कोसळण्याची वाटच हे कर्मचारी पाहतायत..
ब्रिटिश काळातील इमारत
माध्यमांतील वृत्तांनुसार, ही इमारत ब्रिटिशांच्या काळात बांधलेली आहे. तेव्हापासून आज २१ व्या शतकातही तीच इमारत वापरली जात आहे. भिंती आणि छताचे दिवसभर थोडे थोडे प्लास्टरचे तुकडे पडत असतात. कर्मचाऱ्यांना काम करणं तर बंधनकारक आहे. एखादा जरी छताचा किंवा भिंतीचा तुकडा कोसळला तर गंभीर इजा होऊ शकते. त्यामुळे ऑफिसमधले ४० कर्मचारी चक्क हेल्मेट घालूनच बसतात.
कशाचे ऑफिस?
उत्तर प्रदेश राज्यातील बागपत येथील बडौत गावातील हे कार्यालय आहे. इथे वीज विभागाची मीटर टेस्टिंग लॅब आहे. या लॅबसाठीची इमारत ब्रिटिशकाळात बांधण्यात आली आहे. कार्यालयात कंप्यूटर ऑपरेटर म्हणून काम करणारे वेदपाल आर्य म्हणतात, इमारत खूप जीर्ण झाली आहे. कधी कोणता छताचा तुकडा खाली कोसळेल सांगता येत नाही. आतापर्यंत छताचे भाग कोसळल्याने अनेक कर्मचारी जखमी झाले आहेत. पावसाळ्यात ही स्थिती आणखी गंभीर होते. आम्ही अक्षरशः जीव मुठीत घेऊन काम करत असतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेकदा या इमारतीची तक्रार केली आङे. मात्र त्यांच्याकडून काहीही कारवाई झालेली नाही.
मोठ्या अपघाताची प्रतीक्षा
या ऑफिसमध्ये काम करणारे गौरव शर्मा म्हणतात, इमारत प्रचंड जीर्ण आहे. मी सात वर्षांपूर्वी इथे जॉइन केलं. माजी अधिकाऱ्यांनी एक सर्वे केला होता. पण इमारत दुरूस्तीचं काम झालं नाही. इमारतीचं छत कधीही कोसळू शकतं. आता एखादा मोठा अपघात होण्याचीच वाट आम्ही पाहत आहोत. त्यानंतरच इमारत दुरूस्तीला मुहूर्त लागेल.
जिल्हाधिकारी म्हणतात…
हेल्मेट घालून कर्मचारी काम करतानाचा या ऑफिसमधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यानंतर बागपतचे जिल्हाधिकारी राजकमल यादव यांनी याची दखल घेतली. पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडला पत्र लिहून इमारतीची लवकरात लवकर दुरूस्ती सुरु केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. एवढ्या जीर्ण इमारतीत ऑफिस सुरु राहणे धोकादायक आहे. कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर दुसऱ्या इमारतीत स्थलांतरीत केलं जाईल, असा विश्वासदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.