मुंबई : शाओमी मोबाईल (Xiaomi Mobiles) कंपनीला ईडीने (ED) मोठा दणका दिला आहे. या कंपनीची तब्बल 5551 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ईडीने कारावाईचा धडाक लावला आहे. ही कारवाई फेमा (FEMA) या कायद्यानुसार करण्यात आली आहे. Xiaomi India ही चीनमधील Xiaomi समूहाची संपूर्ण मालकीची कंपनी आहे. कंपनीने बेकायदेशीरपणे पाठवलेल्या पैशाच्या संदर्भात या वर्षी फेब्रुवारीमध्ये ED ने Xiaomi विरुद्ध तपास सुरू केला होता. या कंपनीसाठी भारतीय मार्केट सर्वात मोठे आहे. अशा कंपनीच्या बाबतीत एवढी मोठी कारवाई ईडीकडून करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणापासून ते बॉलिवून आणि उद्योगापर्यंत ईडीचे धाडसत्र सुरूच आहे. त्यातून अशा मोठ्या कारवाई करण्यात येत आहेत. या कंपनीने बेकायदेशीररित्या रॉयल्टीच्या नावावर परदेशी बेस कंपन्यांना पैसे पाठवल्याचा आरोप आहे. हे फेमा या कायद्याचे उल्लंघन आहे. असे ईडीकडून सांगण्यात आले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्या मते Xiaomi ने 2014 मध्ये भारतात आपली सेवा सुरू केली. त्यासाठी 2015 पासून पैसे पाठवण्यास सुरुवात झाली. कंपनीने रॉयल्टीच्या नावाखाली 5551.27 कोटी रुपयांचे विदेशी चलन तीन परदेशी संस्थांना पाठवल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये Xiaomi ग्रुपचे एक युनिट देखील समाविष्ट आहे.
रॉयल्टीच्या नावावर एवढी मोठी रक्कम कथितपणे त्यांच्या चिनी मूळ ग्रुपच्या सांगण्यावरूनवरून पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यूएस बेस इतर दोन असंबंधित कंपन्यांना पाठवलेले पैसे देखील Xiaomi या ग्रुपच्या फायद्यासाठी होते. ED च्या म्हणण्यानुसार Xiaomi India ने ज्या तीन परदेशी बेस कंपन्यांना असे पैसे पाठवले होते त्यांच्याकडून कोणत्याही सेवेचा लाभ घेतलेला नाही. त्यामुळे हा व्यवहार बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे.
कंपनीने रॉयल्टीच्या नावाखाली परदेशात पैसे पाठवले, जे FEMA च्या कलम 4 चे उल्लंघन आहे. परदेशात पैसे पाठवताना फर्मने बँकांना दिशाभूल करणारी माहितीही दिल्याचे ईडीने म्हटले आहे. त्याचबरोबर एप्रिलमध्ये चिनी मोबाईल कंपनी Xiaomi चे उपाध्यक्ष मनु कुमार जैन, परकीय चलन कायद्याच्या कथित उल्लंघनाशी संबंधित तपासासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले. फेमाच्या तरतुदींनुसार तपास यंत्रणा कंपनी आणि तिच्या अधिकाऱ्यांची चौकशी करत आहे. आता यात आणखी काही महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.