नवी दिल्ली : उन्हाळ्यात आंब्याची चव चाखण्यासारखं दुसरं सूख नाही. आंब्याची अढी सुटली की गावाकडे त्यावर आपण बालपण मनसोक्त ताव मारला असेल. आंबे गवतात, कागदात गुंडाळून ते पिकण्याची वाट पाहिली असेल. अनेक जण तर उन्हाळ्यात दररोज रसाळ्या झोडतात. म्हणजे रसाचे जेवण करतात. पण गावाकडील आंब्यात गावरान आंबे अंबटगोड असतात. तर आता दशहरी, केशर, बादाम आणि इतर आंब्यांची आवक होते. पण हापूस (Alphonso) आंबा आपण नाव ऐकूनच असतो. कारण तो आंब्याचा राजा म्हणून फेमस आहे आणि हा राजा आपल्या खिशाला काही परवडत नाही. पण आता तुम्हाला हापूसची पण चव चाखता येईल. त्यासाठीच ही खास EMI ची ऑफर आणली आहे.
हापूसचा भाव काय
अप्रतिम स्वाद आणि गोडव्यासाठी हापूस ओळखल्या जातो. महाराष्ट्रातील देवगड आणि रत्नागिरीमध्ये हापूसचे मोठे उत्पादन होते. सर्व प्रकारच्या आंब्यांमध्ये हापूसची वेगळी ओळख आहे. त्याला आंब्याचा राजा म्हणतात. या आंब्याच्या या वैशिष्ट्यामुळे तो महाग झाला आहे. हा आंबा सर्वसामान्यांच्या जेवणातून कायम हद्दपार असतो. त्याचे कारण म्हणजे त्याची किंमत. किरकोळ बाजारात हापूसची किंमत 800 ते 1300 रुपये डझन या दरम्यान असते. त्यामुळे सर्वसामान्यांना हा आंबा परवडत नाही. त्यासाठी आता खास योजना आखण्यात आली आहे.
ईएमआयवर हापूस
पीटीआयने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, विक्री सुरु होताच हापूसचे दर गगनाला भिडतात. त्यामुळे सर्वांनाच या आंब्याची चव चाखता यावी यासाठी ईएमआयचा पर्याय समोर आणण्यात आला आहे. गुरुकृपा ट्रेडर्स आणि फ्रूट प्रोडक्टसचे गौरव सनस यांनी ही अभिनव योजना आणली आहे. देशात ईएमआयवर आंबा विक्री करणारे त्यांचे पहिले दुकान ठरले आहे. सर्वच वस्तू ईएमआयवर , हप्त्यावर मिळत असताना हापूस का नको, या विचारातून त्यांनी ही स्कीम सुरु केली आहे. त्यासाठी अर्थातच काही अटी आणि शर्ती आहेत.
काय आहेत अटी
कोणत्याही व्यक्तीला हापूसची चव आता चाखता येणार आहे. त्यासाठी सनस यांच्या दुकानावर जावे लागेल. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे. तुम्हाला 3,6 अथवा 12 महिन्यांच्या हप्त्यावर हापूस आंबा खरेदी करता येईल. पण त्यासाठी कमीत कमी 500 रुपयांची ऑर्डर द्यावी लागेल. आतापर्यंत सनस यांच्याकडे चार लोकांनी ईएमआयवर हापूसची खरेदी नोंदवली आहे. ऑनलाईन ऑर्डरविषयी मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.