युती तुटली, भाजपने सत्ताधारी पक्षांचे आमदार, खासदार फोडले, मुख्यमंत्र्यांचे वाढले टेन्शन
6 वेळा खासदार असलेल्या मोठ्या नेत्यानेच पक्षाला रामराम केलाय. विशेष म्हणजे हे सर्व आजी माजी आमदार, खासदार हे सत्ताधारी पक्षातील आहेत. ज्या पक्षात या सर्वांनी प्रवेश केला आहे त्या पक्षाने युतीच्या हातमिळवणी चर्चा केली होती.
नवी दिल्ली : गेल्या महिनाभरात 4 विद्यमान आमदार आणि तितकेच माजी आमदार यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली. तर, आता पक्षांचे संस्थापक सदस्य असले आणि 6 वेळा खासदार असलेल्या मोठ्या नेत्यानेच पक्षाला रामराम केलाय. विशेष म्हणजे हे सर्व आजी माजी आमदार, खासदार हे सत्ताधारी पक्षातील आहेत. ज्या पक्षात या सर्वांनी प्रवेश केला आहे त्या पक्षाने युतीच्या हातमिळवणीसाठी चर्चा केली होती. पण, जागावाटपावरून बोलणी फिस्कटली त्यामुळे त्या पक्षाने आमदार, खासदार यांचा आपल्या गोटात आणले आहे. या गटबदलू नेत्यांमुळे मात्र मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना टेन्शन आलंय. त्या सर्व नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मुख्यमंत्री पटनायक यांना चिंतेने ग्रासले आहे.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा पक्ष बिजू जनता दल ओडिशा राज्यात सत्तेत आहे. मात्र, सत्तेत असूनही बिजू जनता दलाच्या अनेक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ओडिशाच्या केंद्रपारा लोकसभा मतदारसंघातील बिजू जनता दलाचे खासदार अनुभव मोहंती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत दोन माजी आमदार आणि अन्य काही नेत्यांनीही पक्षप्रवेश केला. याआधी भर्त्रीहरी महताब यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही पक्ष सोडला आहे.
ओडिशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होत आहेत. या दोन्ही निवडणूक एकत्र होत असल्यामुळे भाजपने मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलासोबत युतीचा प्रस्ताव ठेवला होता. ही युती होणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, जागावाटपावरून बोलणी फिस्कटली आणि युती तुटली. भाजपने निवडणुकीची जबाबदारी राज्यातील नेते संबित पात्रा, धर्मेंद्र प्रधान, बैजयंत जय पांडा या नेत्यांवर सोपविली. यातील बैजयंत जय पांडा हे स्वतः बीजेडीमधून 2019 मध्ये भाजपमध्ये आले आहेत. त्यांनीच या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे.
आता फक्त आदेश येतात
भर्तृहरी महताब यांनी 6 वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. पण त्यांनीही पक्ष सोडला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भर्त्रीहरी महाताब यांनी नवीन पटनायक यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, 1997 मध्ये आम्ही स्थापन केलेला बिजू जनता दल हा आता पूर्वीचा पक्ष राहिला नाही. गेल्या 4 ते 5 वर्षांत भ्रष्टाचार आणि बलात्काराचे आरोप असलेल्यांना तिकीट मिळत आहे. सत्तेत आल्यानंतरही नवीन पटनायक सर्व नेत्यांचा सल्ला घेत असत. राजकीय सल्लागार समिती म्हणजेच पीएसी स्थापन करण्यात आली. पण, आता ही समितीच अस्तित्वात नाही. आता फक्त आदेश येतात आणि त्यांचे पालन करावे लागते अशी टीका त्यांनी केलीय.
नेते का सोडून जात आहेत?
सत्ताधारी पक्षाचे नेते पक्ष सोडून जात असल्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे वारसाहक्काचा संघर्ष. नवीन पटनायक यांना राजकीय वारसा पुढे चालवू शक्ती असे त्यांचे कुटुंब नाही. त्यांचे वयही वाढत आहे. त्यातच माजी आयएएस अधिकारी व्हीके पांडियन यांनी मुख्यमंत्री यांच्याशी अधिक जवळीक साधली आहे. त्यामुळे हे सर्व नेते अस्वस्थ झाले आहेत.
अधिकारी पांडियन हेच सर्व महत्त्वाचे निर्णय घेतात. पूर्वीसारखे नेत्यांचे मत विचारात घेतले जात नाही. त्यामुळे जुने नेते भविष्याबाबत असुरक्षित आहेत. अशावेळी या नेत्यांना सतत मजबूत होत असलेल्या भाजपकडे स्वतःसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून पाहत आहेत. बीजेडीतील कठीण तर भाजपमधील सुरक्षित भविष्य पाहूनच हे नेते भाजपमध्ये जात आहेत. मात्र, बिजू जनता दलाच्या स्थापनेपासून पक्षात असलेले नेतेच पक्ष सोडून जात असल्याने आहेत त्यांचे जाणे हा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.