7 जणांचं कुटुंब नैनीतालला फिरायला गेलं, 25 दिवस झाले तरी परतलंच नाही; असं काय घडलं ज्यामुळे…?
पिकनिकचा प्लॅन बनवला, पिकनिकला गेले आणि परत आलेच नाही तर...? तर काय होईल? एका कुटुंबाच्या बाबतीत असंच घडलं आहे. घरातील सात जण पिकनिकला गेले, ते परत आलेच नाहीत.
आग्रा : नैनीतालच्या धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येक जण आतूर असतो. त्यामुळे अनेकजण पिकनिकसाठी नैनीतालला ( Nainital) प्राधान्य देत असतात. कुटुंबकबिल्यासहच नैनीतालला फिरायला जात असतात. पण फिरायला गेलेले लोक अचानक गायब झाले तर काय होईल? यूपीच्या फिरोजाबादमधील कमलानगरच्या रहिवाशांबाबत काहीसं असच झालं आहे. एका औषधाचा व्यापारी आपल्या कुटुंबासह 15 एप्रिलला फिरायला गेला होता. आग्र्याहून निघालेलं हे कुटुंब अजून (family lost in trip) परतलेलं नाही. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
आग्र्याच्या ट्रान्स यमुनातील श्रीनगर कॉलनीत हे कुटुंब राहतं. राजेश शर्मा असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. त्याची पत्नी सीमा शर्मा, छोटी मुलगी काव्या, मोठा मुलगा अभिषेक विशिष्ठ, त्याची पत्नी उषा आणि त्यांची एक मुलगा विनायक असं हे सात जणांचं कुटुंब नैनीतालला फिरायला गेलं होतं. 15 एप्रिल रोजी ते आग्र्याहून नैनितालला फिरायला गेले होते. तेव्हापासून त्यांचं संपूर्ण कुटुंबच गायब आहे.
पोलिसात तक्रार
राजेश शर्मा यांचा छोटा भाऊ रमाकांत शर्मा यांनी आपला भाऊ आणि त्याचं कुटुंब गायब असल्याची तक्रार दिली आहे. 23 एप्रिल रोजी आपला भाऊ परतणार होता. परंतु अजूनपर्यंत त्यांचा फोनही आलेला नाही. त्यांच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन जयपूर दाखवत आहे. 24 एप्रिलला ते जयपूरला होते असं दिसतंय.
संवाद झाला, परतणार होते…
माहितीनुसार, 23 एप्रिल रोजी संध्याकाळी रमाकांत शर्मा यांचं त्याचा भाचा अभिषेकशी संवाद झाला होता. बरेलीवरून निघाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचू असंही तो म्हणाला होता. राजेश शर्मा यांचे सासरे जगदीश दीक्षित यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 24 एप्रिल रोजी ते आग्र्याला गेले होते. त्यांनी आपली कार आग्र्याला सोडली होती. त्यानंतर ते टूर अँड ट्रॅव्हलची गाडी बूक करून जयपूरला गेले होते. तेव्हापासून सर्वांचे फोन बंद येत आहेत, असं जगदीश दीक्षित यांनी सांगितलं.
घरातच गोडाऊन
आपल्या जावयाने घराचं गोडावून केलं होतं. त्यात ते औषधे ठेवायचे. त्यांची मुलगी काव्या ब्युटीशियनचा कोर्स करत होती. मुलगा अभिषेक औषधांचा व्यापार करत होता. तो वडिलांना मदत करत होता, असंही दीक्षित यांनी सांगितलं. राजेश शर्मा यांचं संपूर्ण कुटुंबच गायब झाल्याने घरातील इतर लोक पोलिसांच्या वारंवार संपर्कात आहेत. संपूर्ण कुटुंब अचानक कसं काय गायब झाले? हे लोक कुठे गेले? याचा शोध घेतला जात आहे.