BREAKING | शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्व विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत कृषी कायद्याबाबत विरोधकांची रणनिती ठरवली जाण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली: दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आजचा 13 वा दिवस आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या सर्व विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक बोलावली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. यात भारतीय कम्यूनिस्ट पक्ष, काँग्रेस यांसह अनेक विरोधी पक्षाचे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. (Meeting of all opposition parties tomorrow under the leadership of Sharad Pawar)
शरद पवार उद्या अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार आहे. यावेळी पवारांसोबत सीताराम येचुरी आणि डी. राजा असतील अशी माहिती मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या पवारांच्या अध्यक्षतेखाली सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत कृषी कायद्याबाबत विरोधकांची रणनिती ठरवली जाण्याची शक्यता आहे.
कृषी कायद्यांना सरसकट विरोध नाही, पण…
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना आमचा सरसकट विरोध नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या मालाला किंमत 100 टक्के मिळाली पाहिजे. त्याबाबत बंधन असलं पाहिजे. नव्या कायद्यात सक्तीचा अभाव आहे. त्याबाबत उत्तर भारतातील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर लोकमत समुहाने त्यांची मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीत पवार यांनी ही भूमिका मांडली आहे.
महाराष्ट्रातील कृषी बाजार समितीची शेती आणि उत्तर भारतातील शेती यात फरक आहे. आपल्याकडे बाजार समित्यांची रचना साधारणपणे शेतकऱ्यांना मान्य असणारी आहे. आम्ही लोकांनीच विचारविनिमय केला. त्यात शेतकऱ्यांना काही स्वातंत्र्य देण्यात यावे, अशी सूचना समोर आली. त्याबाबत महाराष्ट्राने यापूर्वी निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की कृषी बाजार समिती कायम आहे. शेतकऱ्यांना याठिकाणी येऊन शेतमाल विक्रीचा अधिकार आहे. तिथे माल विकताना त्याची किंमत त्याच्या पदरात पडेल, यासाठी खरेदीदारावर बंधनं आजही इथं कायम आहेत,’ असंही पवार म्हणाले.
शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रावरुन निशाणा
शरद पवार यांनी आपल्या कृषी मंत्रिपदाच्या कार्यकाळात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यातील शिला दीक्षित यांना लिहिलेलं पत्र वाचून दाखवत रविशंकर प्रसाद यांनी पवारांवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. तेव्हा पवार यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात कृषी कायद्यात बदल गरजेचा असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर खासगी गुंतवणूक आणि शेतकऱ्यांना आपलं उत्पादन कुठेही विकण्याचा अधिकार मिळावा असं लिहिण्यात आलं होतं.
त्याचबरोबर शरद पवार यांना 2005 मध्ये एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाचा आणि त्यावर पवारांनी दिलेल्या उत्तराचा दाखलाही प्रसाद यांनी दिला. अॅग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट अॅक्ट कधी संपणार? असा तो प्रश्न होता. आणि त्यावर सहा महिन्यात परिणाम दिसतील आणि मार्केट अॅक्टमध्ये सुधारणा केली नाही तर भारत सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळणार नाही, असं उत्तर पवारांनी दिल्याची आठवण प्रसाद यांनी करुन दिली.
Opposition parties are opposing the Narendra Modi govt for the sake of opposition, forgetting their own work in the past. In its 2019 poll manifesto, Congress promised to repeal APMC Act & make trade of agriculture produce including export free from all restrictions: RS Prasad https://t.co/sFOz7rUpXi
— ANI (@ANI) December 7, 2020
शरद पवार तुम्ही अनुभवी नेते आहात. अनेक वर्ष तुम्ही मुख्यमंत्री आणि केंद्रांत मंत्री होता. तेव्हा तुम्ही कृषी धोरणातील सुधारणांबाबत मोदी सरकारपेक्षा जास्त आग्रही होता. मग आज विरोध का करता आहात? याला आपले अस्तित्व राखण्यासाठी शुद्ध राजकारण का म्हणू नये, असा सवाल प्रसाद यांनी विचारला आहे.
संबंधित बातम्या:
‘भारत बंद’ला राज्यभरात प्रतिसाद, बुलडाण्यात रेल्वे अडवली, सर्व APMC मार्केट आणि आडत बंद
Meeting of all opposition parties tomorrow under the leadership of Sharad Pawar