शेतकऱ्यांच्या मोर्चाने वाढविले टेन्शन, नोएडा येथे रस्त्यावर चक्का जाम
राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या मोर्चाने वाहतूक कोंडी झाली आहे. नोएडा प्राधिकरणाने प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमीनींचा योग्य मोबदला मिळावा यामागणीसाठी उत्तर प्रदेश ते दिल्लीतील संसद असा मोर्चा काढण्यात आला आहे.
नवी दिल्ली | 8 फेब्रुवारी 2024 : उत्तर प्रदेशातून दिल्लीला निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला पोलिसांनी नोएडा येथे रोकले आहे. त्यामुळे दिल्ली जवळील नोएडा येथे मोठी वाहतूक कोंडी झाल्याने दिल्लीकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. शेतकरी संघटना डिसेंबर 2023 पासून नोएडा आणि ग्रेटर नोएडा विकास प्राधिकरणद्वार अधिग्रहीत केलेल्या आपल्या जमिनीचा बदल्यात वाढीव मोबदला आणि भुखंड देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. आज या शेतकऱ्यांनी दिल्लीत मोर्चा आणला आहे. या मोर्चेकऱ्यांशी वाटाघाटी करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरुच आहेत.
उत्तर प्रदेशाहून दिल्लीला निघालेला शेतकऱ्यांच्या मोर्च्याला पोलिसांनी नोएडा येथे रोखले आहे. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी चिल्ला बोर्डरच्या दिशेने कूच केली आहे. काही तासांपूर्वी महामाया फ्लायओव्हर जवळ नोएडाच्या दलित प्रेरणा स्थळाजवळ या शेतकऱ्यांना अडविण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळे येथे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीत येणार म्हणून पोलिसांनी आधीच येथील रस्त्यावरील वाहतूक डायव्हर्ट केली होती. क्रेन, बुलडोझर, वज्र वाहन आणि ड्रोन कॅमेरे पोलिसांनी तैनात केले होते. शेतकऱ्यांच्या या मोर्चाने दिल्ली – नोएडा सीमेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहन चालकांना त्रास होऊ नये म्हणून पोलिसांना अनेक मार्गावरील वाहतूक वळविली आहे. दिल्ली-नोएडा चिल्ला बॉर्डरवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांशी वाटाघाटी करण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले आहेत.
शेतकऱ्यांशी बोलणी सुरु
या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनापूर्वीच कलम 144 लागू केलेले आहे. पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे. धार्मिक, राजकीय सह कोणत्याही मिरवणूकांना मनाई केलेली आहे. ट्रॅफीक पोलिसांनी दादरी, तिलपता, सूरजपूर,सिरसा, रामपुर-फतेहपूर आणि ग्रेटर नोएडाच्या अनेक मार्गांवर वाहतूक वळविली असून जनतेला यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत. नोएडा आणि ग्रेटर नोएडात आधी पासून कलम 144 लागू असून सर्व सीमा 24 तासांसाठी सील केल्या असल्याचे गौतमबुद्ध नगरचे एसीपी ( कायदा आणि सुव्यवस्था ) शिवहरी मीणा यांनी सांगितले. शेतकऱ्यांशी बोलणी करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. नोएडात येणाऱ्या सर्व गाड्यांची तपासणी सुरु आहे.
शेतकऱ्यांचे आंदोलन कशासाठी ?
नोएडा आणि ग्रेटर नोएडा विकास प्राधिकरणाने शेतकऱ्यांच्या जमिन संपादित केल्या आहेत. त्याचा मोबदला दुपटीने मिळावा, तसेच पर्यायी जमिनी देण्यात याव्यात या मागणीसाठी शेतकरी संघटना डिसेंबर 2023 पासून आंदोलन करीत आहेत. शेतकरी संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी राज्य सरकार आणि स्थानिय प्रशासनावर दबाव वाढविण्यासाठी 7 फेब्रुवारी रोजी किसान पंचायत भरविली होती. 8 फेब्रुवारीला राजधानी दिल्लीतील संसदेपर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा केली होती.