MS Swaminathan | हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन
भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या एम.एस. स्वामीनाथन यांनी कृषीक्षेत्रात जादा उत्पन्न देणाऱ्या गव्हाच्या आणि तांदळाच्या जाती शोधून काढल्या.
चेन्नई | 28 सप्टेंबर 2023 : भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ.एम.एस. स्वामीनाथन यांच्या वयाच्या 98 व्या वर्षी आज निधन झाले आहे. कृषी संशोधक असलेल्या एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडूतील तंजावूर येथे झाला होता. त्यांना 1997 मध्ये पद्मश्री, 1972 रोजी पद्मभूषण आणि साल 1989 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. शेती क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांनी जगभरात सन्मान मिळाला होता.
गहू आणि तांदळाच्या जाती शोधल्या
1949 मध्ये बटाटा, गहु, तांदुळ आणि ज्युट यांच्या गुणसूत्रांवर संशोधनाने करीयरची सुरुवात केली होती. हरित क्रांती कार्यक्रम अंतर्गत त्यांनी अधिक उत्पन्न देणाऱ्या गव्हाच्या आणि तांदळाच्या जाती शोधून काढल्या. त्यांच्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना फायदा झाला असून भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला. स्वामीनाथन यांनी 1943 मध्ये बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळ आणि देशातील अन्नधान्याच्या टंचाईचा अनुभव आल्यानंतर त्यांनी कृषिक्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी झुलॉजी, एग्रीकल्चर दोन्ही विषयात विज्ञानात पदवी संपादन केली होती.
दुष्काळात बहुमोल कार्य केले
1960 च्या दशकात देशात मोठ्याप्रमाणावर दुष्काळ पडणार होता. त्यावेळी स्वामीनाथन यांनी अमेरिकन संशोधक नॉर्मन बोरलॉग आणि अनेक वैज्ञानिकांच्या मदतीने गव्हाची जादा उत्पन्न देणारे ( HYV ) बीजाचा शोध लावला. स्वामीनाथन यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेत 1972 ते 1979 पर्यंत तर आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत 1982 ते 1988 पर्यंत महासंचालक म्हणून काम केले.