उत्तर प्रदेशात कानपूरनंतर (UP) आता आग्र्यातही (Agra Religious tension) धार्मिक तणाव निर्माण झालाय. दोन बाईकर्सच्या भांडणाचं रुपांतर थेट धार्मिक तणावात झालंय. कानपूर, (Kanpur) आग्रा ही मोठी शहरं आहेत पण त्यामुळे योगी सरकारची डोकेदुखी वाढलीय. एका सडकचं काम सुरु होतं आणि त्याचवेळेस तिथं दोन बाईकर्सचा टकराव झाला पण बघता बघता त्या भांडणाचं पर्यावसन थेट दंगलीत झालं. तुफान दगडफेक केली गेली. राडा झाला.
दगडफेकीची ही घटना आग्र्यातल्या बसई गंज खुर्द भागात घडलीय. तिथं एका सडकचं काम सुरु होतं. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात राडारोडा पडला होता. त्याचवेळेस दोन बाईकर्स एकमेकांसमोर आले. त्यांच्या गाडीची हलकिशी टक्कर झाली. त्यातून दोघात भांडण झालं. आजुबाजूनं मग गर्दी जमत गेली. ही गर्दी विभागली गेली. जमलेल्या गर्दीनं मग
एकमेकांवर तुफान दगडफेक केली. मोठा राडा झाला. थोड्याच वेळात पोलीस दाखल झाले पण तोपर्यंत घडायचं ते घडून गेलं होतं. दरम्यान कानपूरमध्ये जी दंगल उसळली, त्यातल्या आरोपींची धरपकड सुरुच आहे. आतापर्यंत 29 जणांना अटक केली गेलीय.
कानपूर दंगलीचा मुख्य आरोपी हयात जफर हाशमीला रविवारी स्पेशल मॅजिस्ट्रेटसमोर हजर केलं गेलं. तिथं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. पोलीस आज पुन्हा कोर्टासमोर त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. दरम्यान कानपूरच्या दंगली प्रकरणी आणखी पाच जणांना अटक करण्यात आलीय. आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या ही 29 वर पोहोचलीय. एकूण आरोपींचा आकडा हा 100 च्या वर आहे.
उत्तर प्रदेशात एका मागून एक होणाऱ्या दंगलीत पीएफआयचा हात आहे का याचाही तपास केला जातोय. कानपूर घटनेची चौकशी करण्यासाठी एका एसआयटीची स्थापन करण्यात आलीय. कानपूर पोलीस आयुक्त विजयसिंह मीणा यांनी पीएफआयच्या कनेक्शनच्या चौकशीची घोषणा केलीय. कारण नेमकं त्याचदिवशी पीएफआयनं मणिपूर आणि पश्चिम बंगाल बंदचं आवाहन केलं होतं.