‘लव्ह यू पोलीस मामा, मी तुमच्यापेक्षा हुशार आहे..’ आधी चोरी केली मग लिहिलं इंग्लिशमध्ये लेटर, पोलीस वाचून हैराण
आजपर्यंत तुम्ही चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील, मात्र बिहारच्या पूर्व चंपारण्य जिल्ह्यात असा एक चोर आहे जो फक्त दिवसाच चोरी करतो, सोबतच पोलिसांची फिरकी देखील घेत आहे.

आजपर्यंत तुम्ही चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील, मात्र बिहारच्या पूर्व चंपारण्य जिल्ह्यात असा एक चोर आहे जो फक्त दिवसाच चोरी करतो, सोबतच पोलिसांना डिवचण्यासाठी जिथे चोरी केली तिथे एक पत्र देखील ठेवतो, ज्या पत्रामध्ये ‘लव्ह यू पोलीस माला, मी तुमच्यापेक्षा अधिक हूशार आहे, आतापर्यंत मी आठ घरांमध्ये चोरी केली आहे, अजून देखील दोन घरांमध्ये चोरी करायची बाकी आहे, जर तुमच्यात दम असेल तर मला पकडून दाखवा. मला माहीत आहे, हे सर्व लोक रात्रभर जागत असतात, माल पकडण्याची पूर्ण प्लॅनिग रात्री केली जाते, म्हणून मी दिवसाच चोरी करतो असा मजकूर या पत्रामध्ये आहे. हा चोर पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला असून, संपूर्ण जिल्ह्यात पोलीस या चोराला शोधण्यासाठी फिरत आहेत, मात्र अजूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये.
चोर ज्या घरात चोरी करतो त्या घरात ठेवत असलेल्या लेटरमुळे हा चोर सुशिक्षित असावा असं वाटतं, कारण चोर पोलिसांन जे लेटर लिहितो ते लेटर तो चक्क इंग्रजीमधून लिहीत आहे. त्याची लेटर लिहिण्याची पद्धत देखील युनिक आहे, कारण तो लेटर लिहिताना प्रत्येक शब्दामध्ये स्पेस सोडतो. त्यामुळे आता असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे की, हा चोर जर खरच इतका हुशार आणि सुशिक्षित असेल तर तो चोरी का करत आहे, आणि वरून पोलिसांसोबत असा खेळ का खेळत आहे? कोणी पोलिसांची फिरकी घेत आहे का?
पोलिसांना या चोराची आणखी एक चिठ्ठी सापडली आहे, त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं की मी आज ज्या घरात चोरी करत आहे, ते घर मला एखाद्या गरीब माणसाचं वाटत आहे, कारण यापूर्वी मी ज्या घरामध्ये चोरी केली होती, त्या घरामध्ये मला मोठ्याप्रमाणात पैसे आणि सोनं सापडलं होतं. पण या घरात मला काहीच सापडलं नाही. आता हा चोर पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला असून, या चोराच्या शोधासाठी पोलिसांनी पथकांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान लोकांमध्ये देखील या चोराची एवढी दहशत पसरली आहे की लोक दिवसा आपल्या घराला कुलूप लावून घराची राखन करत आहेत, तर पोलीस देखील या चोराचा शोध घेत आहेत, मात्र अजूनही हा चोर पोलिसांच्या हाती सापडलेला नाहीये.