Five Star Food: येथे कैद्यांना मिळते पंचतारांकित दर्जाचे जेवण, FSSAI ने दिले रेटिंग
FSSAI च्या वतीने पॅनलमध्ये सामील असलेल्या तपासणी पथकाने येथील अन्न धान्यांना अव्वल दर्जा दिला आहे. अशा प्रकारचे प्रमाणपत्र मिळविणारे हे पहिलेच कारागृह आहे.
फरिदाबाद, जेवणाची चव आणि दर्जा चांगला नसला तर अनेक जण त्याला सर्रास जेल मधल्या कैद्यांना (Prisoners) मिळणाऱ्या जेवणाची उपमा देतात, मात्र यापुढे अशी उपमा देताना थोडा विचार करा. कारण भारतात एक असे कारागृह आहे जिथे कैद्यांना मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा चक्क पंचतारांकित हॉटेल (Five Star Food) इतका चांगला आहे. वाचून आश्चर्य वाटत असले तरी हे खरे आहे. उत्तर प्रदेशातीच्या फरिदाबाद (UP Faridabad) जिल्ह्यातील फतेहगड (Fatehgarh) येथे हे तुरुंग आहे. या तुरुंगात कैद्यांना पंचतारांकित दर्जाचे भोजन दिले जात आहे. हे रेटिंग FSSAI या संस्थेने दिले आहे. तुरुंगात 1100 पेक्षा अधिक कैदी आहेत. विशेष म्हणजे तुरुंगातील कैदी हे एखाद्या नामांकित हॉटेलच्या शेफप्रमाणे अँप्रनचा पेहराव करून भोजन तयार करतात.
FSSAI ने दिले प्रमाणपत्र
भारतातच काय तर जगभरात तुरुंगांतील जेवणाच्या दर्जावरून नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. निकृष्ठ अन्नाच्या विरोधात अनेकदा कैदी तुरुंगातच आंदोलन देखील करतात. परंतु उत्तर प्रदेशातील एका तुरुंगात कैद्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाला पंचतारांकितचा दर्जा मिळाला. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने फतेहगड येथील तुरुंगातील भोजनास अव्वल रेटिंग दिली. FSSAI च्या प्रमाणपत्रात पंचतारांकित चिन्ह असून उकृष्ट असा शेरा मारला आहे. तुरुंगाधिकारी अखिलेश कुमार यांनी म्हटले की, हे प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले होते.
अशी आहे जेवणाची गुणवत्ता
भोजनाची गुणवत्ता ही अन्न धान्य आणि जेवण तयार करणाऱ्यांचा ड्रेस कोड यांवरून ठरते. या तुरुंगात शाकाहारी भोजन तयार केले जाते. तुरुंगातील कैद्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सात्त्विक भोजन दिले जाते. त्यात मसूर, हरभऱ्याची डाळ, उडीद डाळीचा समावेश आहे. या डाळी कैद्यांना आलटून पालटून दिल्या जातात. FSSAI च्या वतीने पॅनलमध्ये सामील असलेल्या तपासणी पथकाने येथील अन्न धान्यांना अव्वल दर्जा दिला आहे. अशा प्रकारचे प्रमाणपत्र मिळविणारे हे पहिलेच कारागृह आहे.