घरात रडारड, अंतिम तयारीही सुरू, तेवढ्यात नेताजींनी… अन्… ‘त्या’ घरात काय घडलं?
कुटुंबियांना तर हा चमत्कारच वाटत असून ते त्यांच्या स्वस्थ प्रकृतीसाठी प्रार्थनाही करत आहे. कुठे घडला हा धक्कादायक प्रकार ?
आग्रा | 7 ऑगस्ट 2023 : उपचारांसाठी दवाखान्यात आलेल्या रुग्णाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने वातावरण शोकाकूल झाले. रडून-रडून कुटुंबियांची अवस्था बिकट झाली होती. तरी त्यांनी मनावर दगड ठेऊन अखेरची तयारीही सुरू केली होती. तेवढ्यात त्या शरीराची हालचाल झाली आणि ‘त्यांनी’ डोळे उघडले. आणि एकच गोंधळ माजला. मृत इसम पुन्हा जीवंत (man alive after declared dead) झाल्याने सर्व जण हैराण झाले होते. याची संपूर्ण शहरात चर्चा सुरू आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे हैराण करणारी ही घटना घडली आहे. महेश बघेल असे या व्यक्तीचे नाव असून ते भाजपचे (BJP) माजी जिल्हाध्यक्ष होते. त्यांची तब्येत बिघडल्याने त्याला एका रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार तर सुरू होते, पण तब्येत जास्त बिघडली आणि अखेर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे ऐकून कुटुंबीय दु:खात बुडाले आणि रडारड सुरू झाली. त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच इतर नातेवाईकही त्यांच्या घरी येण्यास निघाले.
सोशल मीडियावरही वाहिली श्रद्धांजली
बघेल यांच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळच्या लोकांनी त्यांना सोशल मीडियावरही श्रद्धांजली वाहण्यास सुरूवात केली. संपूर्ण घर शोकसागरात बुडालं होतं. अंत्यसंस्काराची तयारीही सुरू झाली होती. तेवढ्यात महेश यांनी डोळे उघडले, त्यांच्या श्वासोच्छवासही सुरू झाला. हे पाहून सर्वच चक्रावले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केले
कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष महेश बघेल हे शहरातील एका रुग्णालयता दाखल होते. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर कुटुंबिय त्यांना घरी आणले. मात्र घरात आल्यावर त्यांनी पुन्हा श्वास घेतला आणि डोळे उघडले. त्यानंतर बघेल यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बघेल जिवंत असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनीही रुग्णालयात धाव घेतली. कुटुंबासह भाजप कार्यकर्ते याला देवाचा चमत्कार मानत आहेत, तसेच ते बघेल यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थनाही करत आहेत.