माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम यांचे निधन; वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम (Pandit Sukh Ram) यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याबाबत हिमाचल काँग्रेसच्या (Himachal Pradesh Congress) वतीने ट्विट करत माहिती देण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे. इश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हिमाचल प्रदेश काँग्रेस कमेटी या दुःखाच्या प्रसंगात पंडित सुखराम यांच्या परिवारासोबत असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान पंडित सुखराम यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
90 च्या दशकात केंद्रीय मंत्री
पंडित सुखराम हे 90 च्या दशकात काँग्रेस सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. ते हिमालचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. तसेच ते तब्बल पाच वेळा आमदार देखील होते. हिमाचल प्रदेशमध्ये त्यांची ओळख पंडित सुखराम अशीच होती. मात्र त्यांचे नाव दूरसंचार घोटाळ्यात समोर आल्याने त्यांच्या प्रतिमेला तडा केला. पंडित सुखराम हे 1996 मध्ये पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळामध्ये दूरसंचार मंत्री होते. याचदरम्यान त्यांच्यावर दूरसंचार घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. पुढे या घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली.
घरात सापडले कोट्यावधी रुपये
पंडित सुखराम हे पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळामध्ये दूरसंचार मंत्री होते. याचदरम्यान त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. पैसे घेऊन अवैध पद्धतीने दूरसंचार क्षेत्रात काही करार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली. सीबीआयच्या चौकशीदरम्यान सुखराम यांच्याकडे 3.6 कोटी रुपये आढळून आले. त्यातील 2.45 कोटी रुपये त्यांच्या घरात तर 1.16 कोटी रुपये हे मंडी स्थित बंगल्यामध्ये आढळून आले होते. तेव्हा या विषयाची चांगलीच चर्चा झाली. वृत्तपत्रात बातम्या छापून आल्या. यातूनच त्यांचे आणि काँग्रेस श्रेष्ठींचे वाद झाले. अखेर त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. दूरसंचार घोटाळ्यात सुखराम हे दोषी आढळल्याने त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.