तरुणांच्या देशात वृद्धांचे हाल, ज्येष्ठांना एसटीकडून 100 टक्के सवलत, पण रेल्वेने का काढून घेतली 50 टक्के सवलत
कोरोनाकाळात रेल्वेची ज्येष्ठ नागरिकांची प्रवास सवलत अचानक बंद करण्यात आली. कोरोनाची साथ गेल्यावर रेल्वेच्या इतर सर्व सेवा सुरळीत सुरु झाल्या परंतू ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीवर आलेले गंडांतर काही संपलेले नाही.
मुंबई | 29 जुलै 2023 : एकीकडे राज्य आणि केंद्रात डबल इंजिन सरकार म्हणून सरकारचे धुरिण नागरिकांना सेवासुविधा वाढत असल्याचे नारे देत आहेत. वेगाने विकास होत असल्याचे ढोल बडवले जात आहेत. एकीकडे महाराष्ट्रात एसटी बसेसमध्ये ज्येष्ठ नागरीकांना मोफत प्रवासाची सुविधा तर दुसऱ्या बाजूला रेल्वेत कोरोनाकाळात बंद केलेली सिनियर सिटीझन सवलत अजूनही सुरु करण्याचे नाव केंद्र सरकार काही केल्या घेत नसल्याने रेल्वेने प्रवास करणारे लाखो ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत.
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे शिवसेना गट आणि भाजप आणि आता अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट असे तिहेरी इंजिन सरकार आले आहे. परंतू राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचा रेल्वे प्रवास काही सुखकर होण्याचे नाव नाही. कोरोनाकाळात रेल्वेवर निर्बंध आल्यानंतर बंद केलेली ज्येष्ठ नागरिकांची तिकीट सवलत अजूनही सुरु करण्यात आलेली नाही. रेल्वेमधून कोट्यवधी ज्येष्ठ नागरिक रोज रेल्वेने प्रवास करतात.
केंद्रीय संसदीय समितीचे आवाहन
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत मार्च महिन्यात यावर उत्तर देताना स्पष्ट केले होते की साल 2019-2020 मध्ये भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या तिकीटावर 59,837 कोटी रुपयांची सबसिडी दिली होती. सबसिडीद्वारे प्रत्येक प्रवासी व्यक्तीला सरासरी 53 टक्के सवलत देण्यात येत असते. संसदीय समितीने ज्येष्ठ नागरिकांची सवलत पुन्हा बहाल करावी अशी शिफारस केली होती. स्थायी समितीने ज्येष्ठ नागरिकांना स्लीपर आणि एसी – 3 मध्ये सवलतीचा आढावा घेऊन ती पुन्हा बहाल करण्याचा सल्ला दिला होता. कोरोनाकाळात रेल्वेने 23 मार्च 2020 पासून सर्व प्रवासी गाड्यांचे संचलन बंद केले होते. केंद्रीय संसदीय समितीच्या आवाहनानंतर रेल्वे मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिकांच्या सवलत बहालीबाबतचा निर्णय अद्यापही घेतलेला नाही.
सवलत नाकारल्याने 2,242 कोटी मिळाले
1 एप्रिल 2022 ते मार्च 2023 दरम्यान सुमारे 4.6 कोटी पुरुष, 3.3 कोटी महिला आणि 18,000 तृतीय पंथी आदी आठ कोटी ज्येष्ठ नागरिकांना सवलत नाकारल्याने त्यांच्याकडून आकारलेल्या तिकीटातून 5,062 कोटी रुपये मिळाले. यात सवलती पोटीची रक्कम गृहीत धरल्यास एकूण 2,242 कोटी जादा मिळाले असल्याचे रेल्वेने माहीतीच्या अधिकारात म्हटले होते.
अरविंद केजरीवाल यांची मागणी
रेल्वे ज्येष्ठ नागरिकांत 60 वर्षांवरील पुरुषांना तिकीटात 40 टक्के सवलत देते, तर 58 वर्षांवरील महिलांना 50 टक्के सवलत देते. रेल्वेच्या बजेटचा आवाका 45 लाख कोटी आहे. आणि सिनियर सिटीझन कोटात बंद केल्याने जर 1600 कोटी वाचत असतील तर रेल्वेच्या बजेट समोर ही रक्कम शुल्लक असल्याचे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रेल्वेने मोठे मन दाखवून सिनियर सिटीझन यांची प्रवास सवलत सुरु करावी अशी मागणी केंद्र सरकारला एक एप्रिल रोजी पत्र लिहून केली होती.