मणिपूर पुन्हा पेटले; पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात इंटरनेट सेवा बंद…
जमावबंदी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये ककचिंग, जिरिबाम, थौबल, इंफाळ पश्चिम आणि बिष्णुपूर आणि आदिवासीबहुल चुराचंदपूर, कांगपोकपी आणि टेंगनौपाल या जिल्ह्यांचा समावेश असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
नवी दिल्ली : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला असल्याने राज्यातील दोन जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बिष्णुपूर आणि चुरचंदपूरमध्ये या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हिंसाचार घडल्याने पुढील पाच दिवस संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्याबरोबरच दोन्ही जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. राज्यातील इतर भागात शांतता राखण्यासाठी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे करण्यात आले असल्याचे बिष्णुपूरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
चुरचंदपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, हिंसाचाराच्या ताज्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पावले उचलण्यात आली आहेत.
चुरचंदपूर हा आदिवासीबहुल परिसर आहे. शांतता भंग आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे. मणिपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनेक भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
कुकी ग्रामस्थांना राखीव वनक्षेत्रातून बेदखल केल्याबद्दल निदर्शने आणि जाळपोळ केल्यानंतर चुराचंदपूर जिल्ह्यातील न्यू लामका येथे हा तणाव कायम आहे.
यापूर्वी चुरचंदपूरमध्ये सीएम एन बिरेन सिंह यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जमावाकडून तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर येथे जाळपोळही झाली आहे, त्या घटनेपासून या ठिकाणी तणाव कायम राहिला आहे.
मणिपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मेईतेई समुदायाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याबाबत निदर्शने सुरू आहेत. हे आंदोलन पेटल्यानंतर बुधवारी राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.
जमावबंदी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये ककचिंग, जिरिबाम, थौबल, इंफाळ पश्चिम आणि बिष्णुपूर आणि आदिवासीबहुल चुराचंदपूर, कांगपोकपी आणि टेंगनौपाल या जिल्ह्यांचा समावेश असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.