नवी दिल्ली | 31 डिसेंबर 2023 : काँग्रेस पक्ष मणिपूर ते मुंबई अशी भारत न्याय यात्रा काढणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. कॉंग्रेसने भारत न्याय यात्रेचा प्रोमो व्हिडिओ तयार केला. या प्रोमो व्हिडिओमध्ये एक कविता वापरण्यात आली आहे. ही कविता भाजप नेते आणि दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची होती. तसेच, या कवितेला भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी आवाज दिला होता. काँग्रेस पक्षाच्या ही चूक लक्षात येताच हा व्हिडिओ तातडीने हटवण्यात आला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत न्याय यात्रेच्या प्रोमोचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. पण, यात गमतीची गोष्ट अशी झाली की त्यातील कविता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आहे. 2016 मध्ये लोकसभेतील भाषणादरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ही कविता वाचली होती.
काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेचा प्रचार करण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. व्हिडीओमधील ग्राफिक्समध्ये एका मुलाने बाबांना गूजपंप म्हणजे काय असे विचारले. तेव्हा बाबा उत्तर देतात, गुसबंप्स, चल माझ्यासोबत. यानंतर स्मृती इराणीचा आवाज असलेला व्हिडिओ वाजू लागतो. लोकांनी जेव्हा हा व्हिडिओ ऐकला तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या लक्षात ही चूक आणून दिली. मात्र, तोपर्यंत अनेक युजर्सनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
भाजपचे सर्वात मोठे नेते माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची कविता स्मृती इराणी यांच्या आवाजात व्हिडिओमध्ये ऐकता येईल. त्यात त्या म्हणतात, आम्ही या भारतासाठी जगू, या भारतासाठी आम्ही मरू आणि मृत्यूनंतरही गंगेच्या पाण्यात तरंगणारी आमची राख कोणी ऐकली तर एकच आवाज येईल ‘भारत माता की जय’.
काँग्रेस पक्षासाठी ज्याने हा व्हिडिओ तयार केला त्या लेखकाला आणि व्हॉईस ओव्हरला ही कविता कुणाची हे माहित नव्हते. तसेच ही कविता कुणी म्हटली याचीही माहिती नव्हती. त्यामुळे ही चूक झाली असे आता कॉंग्रेसकडून सांगण्यात येत आहे. तसेच, चूक लक्षात आल्यानंतर व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे.