औषध खाऊन टॉयलेटला गेला अन् सोनं पडलं… अजबच घडलं
गाझियाबादमध्ये एक अजब घटना घडली आहे. येथे डॉक्टरांनी एका तरुणाला जुलाबाचे औषध दिल्याने तो तातडीने टॉयलेटला गेला. पण तेथे त्याच्या पोटातून सोन्याची नाणीचं पडू लागली.
गाझियाबाद | 24 जानेवारी 2024 : राजधानी दिल्लीला लागूनच असलेल्या गाझियाबादमध्ये एक अजब घटना घडली आहे. येथे डॉक्टरांनी एका तरुणाला जुलाबाचे औषध दिल्याने तो तातडीने टॉयलेटला गेला. पण तेथे त्याच्या पोटातून सोन्याची नाणीचं पडू लागली. रात्री उशिरापासून या तरुणाला दर अर्ध्या तासाने औषधाचा डोस दिला जात असून नाणी पडण्याचा क्रम सुरूच आहे. हा तरुण सौदी अरेबियातून सोन्याची तस्करी करून गाझियाबादमार्गे रामपूरला जात होता. मा्र पोलिसांनी त्याला वेळीच रोखत बेड्या ठोकल्या. गाझियाबादच्या सिहानी गेट पोलिस स्टेशन परिसरात बस स्टँडजवळ त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी गाझियाबाद बसस्थानकावर एक सोने तस्कर असल्याची माहिती मिळाली होती. आरोपी सौदी अरेबियातून येत असून गाझियाबादमार्गे रामपूरला जाणार होता, अशी खबर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत नाकाबंदी केली आणि दोन तरुणांना पकडले. अटक केलेल्या या तरूणांनी चौकशीत आधी तर पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला. सौदी अरेबियात असताना सोन्याची गोळी तयार रून त्या गिळल्याची कबुली त्यांनी दिली.
रामपूरला नेणार होते सोनं
सोन्याची ही खेप घेऊन ते आरोपी रामपूरला जाणार होते. या खुलाशानंतर पोलीस आरोपीला घेऊन एमएमजी हॉस्पिटल गाठलं आणि तेथे डॉक्टरांनी त्याला जुलाबाचं औषध दिले. त्यानंतर आरोपींच्या पोटातून 12 सोन्याची नाणी सापडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तस्कराला डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर दुसऱ्याला दर अर्ध्या तासाने जुलाबाचे औषध दिले जात आहे. त्याच्या पोटातून नाणी बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरूच आहे.
पोलीस करत आहेत रॅकेटचा तपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. या दोन तस्करांच्या अटकेनंतर पोलिसांनी तस्करीचे साखळी मार्ग आणि त्यात सहभागी असलेले इतर लोक शोधण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी या टोळीत सामील असलेल्या काही लोकांची नावं आणि गुन्ह्यातील त्यांची भूमिकाही उघड केली आहे. मात्र, या सर्व नावांची पोलिस पडताळणी करत आहेत.