साडेतीन हजार टन सोने असलेला डोंगर सापडला!
उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथे शास्त्रज्ञांना मोठी सोन्याची खाण सापडली आहे. या खाणीत सोन्यासह इतरही अनेक मौल्यवान खनिजं आहेत.
लखनौ : उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथे शास्त्रज्ञांना मोठी सोन्याची खाण सापडली आहे (Gold Mine found in Sonbhadra). या खाणीत सोन्यासह इतरही अनेक मौल्यवान खनिजं आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे (Geological survey of India) शास्त्रज्ञ मागील मोठ्या काळापासून या भागात शोध घेत होते. अखेर त्यांना हा मोठा खनिज साठा सापडला आहे.
जीएसआयच्या अंदाजानुसार सोनभद्रमधील चोपन ब्लॉकच्या या डोंगरात जवळपास 2943.26 टन आणि हरदीमध्ये जवळपास 646 किलो सोनेमिश्रित धातू सापडला आहे. या दोन्ही ठिकाणचा मिळून एकूण जवळपास साडेतीन हजार टन सोनेमिश्रित धातू मिळाला आहे. यापासून 1500 टनच्या आसपास सोनं निघण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या जिल्ह्यातील अन्य ठिकाणांवरही लोह, पोटॅश, सिलीमॅनाईट, अँडालूसाईट ही खनिजंही सापडली आहेत.
अशाप्रकारे जीएसआयने मिश्र स्वरुपातील सोन्याव्यतिरिक्त 90 टन अँडालूसाईट, 9 टन पोटॅश, 15 टन लोह मिश्रण आणि 10 मिलियन टन सिलेमिनाईट खनिज संपत्ती शोधली आहे. याच्या लिलावाचे आदेशही निघाले आहेत. त्याआधी या सर्व खनिज संपत्तीच्या ठिकाणांचं जिओ टॅगिंग केलं जाणार आहे. त्यासाठी 7 सदस्यांचं पथक तयार करण्यात आलं आहे. 22 फेब्रुवारीपर्यंत संबंधित पथक आपला अहवाल सादर करणार आहे. यानंतर याची जबाबदारी राज्याकडे देऊन याचं ई टेंडर काढण्याचे निर्देश येऊ शकतात. ई टेंडरला मंजूरी मिळाल्यानंतरच उत्खननासाठी परवानगी मिळेल.
Gold Mine found in Sonbhadra