वंदेभारत स्लिपर कोचबाबत आली आनंदाची बातमी, गाडी या तारखेला रुळांवर येणार
मुंबईतून सुरुवातीला मुंबई सेंट्रल ते गांधीनगर कॅपिटल ही वंदेभारत ट्रेन सुरु झाली होती. त्यानंतर मडगाव- सीएसएमटी वंदेभारत, नंतर सोलापूर ते सीएसएमटी एक्सप्रेस आणि साईनगर शिर्डी ते सीएसएमटी या वंदेभारत सुरु झाल्या. तर नागपूर ते बिलासपूर अशा वंदेभारत चेअर कार ट्रेन सुरु झाल्या आहेत. परंतू आता वंदेभारत स्लीपर चालू करण्यात येणार आहे.
वंदेभारत ही देशाची पहीली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. या ट्रेनला पूर्वी ट्रेन-18 म्हटले जायचे. नंतर तिचे नामकरण वंदेभारत एक्सप्रेस ( Vande Bharat Express ) असे करण्यात आले. वंदेभारत ही इंजिन लेस ट्रेन आहे. त्यामुळे तिला लांबपल्ल्यांच्या इतर गाड्याप्रमाणे डिझेल किंवा वीजेवरील इंजिन लावण्याची काही गरज नसते. सध्या देशभरात 100 वंदेभारत ट्रेन सुरु आहेत. त्यातील काही ट्रेन 16 डब्यांच्या तर काही ठिकाणी प्रवासी कमी असल्याने 8 डब्यांच्या ट्रेन चालविण्यात येत आहेत. पहिली वंदेभारत नवी दिल्ली ते वाराणसी अशी चालविण्यात आली होती. पहिली वंदेभारत ट्रेन 15 फेब्रुवारी 2019 रोजी सुरु झाली होती. आतापर्यंत या ट्रेनच्या स्लीपर व्हर्जन आल्या नव्हत्या. त्यामुळे आता लवकरच वंदेभारत स्लीपर कोचची सुरुवात होणार आहे.
बहुप्रतिक्षित वंदेभारत ट्रेनचा स्लीपर कोच ( Vande Bharat Express sleeper coach ) ऑगस्ट महिन्यात चेन्नईतील इंटेग्रल कोच फॅक्टरीतून ( आयसीएफ ) बाहेर पडणार आहे. या स्लीपर कोचची ट्रायल घेतली जाणार आहे. सहा महिन्यानंतर ही स्लिपर कोच वंदेभारत प्रत्यक्ष रुळावर येणार आहे. साल 2029 पर्यंत 300 हून अधिक वंदेभारत स्लीपर आणि चेअरकार ट्रेन देशभर सुरु करण्यात येतील. तर सर्वसामान्य जनतेसाठी 400 नॉन एसी अमृतभारत ट्रेन सुरु करण्यात येणार आहेत. वंदेभारत स्लिपर कोच पहिल्या टप्प्यात 130 किमी वेगाने चालविण्यात येणार आहेत.
इतक्यांची डब्यांची स्लीपर ट्रेन
भारतीय रेल्वेच्या रुळांची क्षमता वाढविल्यानंतर वंदेभारत स्लिपर कोच ट्रेन प्रति तास 160 ते 220 किलोमीटर वेगाने चालविण्यात येतील त्यामुळे प्रवाशांना आरामात झोपून दिल्ली गाठता येणार आहे. देशातील पहिली वंदेभारत sleeper coach डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात दिल्ली ते कोलकाता किंवा दिल्ली ते मुंबई या पैकी एका मार्गावर धावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वंदे भारत स्लिपर कोचमध्ये 16 डबेच असणार आहेत. यात दहा डबे एसी-3, आणि चार डबे एसी-2 आणि एक डबा एसी- 1 चा असणार आहे. तर दोन डबे एसएलआर असतील.
वंदेभारत स्लीपरचे भाडे ?
वंदेभारत स्लीपर कोच आवृत्तीचे भाडे अद्याप निश्चित झालेले नाही. या गाडीचा वेग, सोयी सुविधा आणि सुरक्षा पाहाता या ट्रेनचे भाडे राजधानी एक्सप्रेस आणि शताब्दी एक्सप्रेसच्या भाड्याच्या 10 ते 15 टक्के अधिक असण्याची शक्यता आहे. या स्लीपर वंदेभारत राजधानी आणि शताब्दीच्या जागी चालविण्याची योजना आहे. मुंबई ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस सध्या स्वतंत्र इंजिन लावून चालविण्यात येतात, त्यामुळे प्रवाशांना धक्के बसतात. तसेच त्यांच्या वेगावर देखील मर्यादा येते. वंदेभारतना स्वतंत्र इंजिन लावण्याची गरज नाही. त्यामुळे या गाड्यांचा वेग वाढविता येणार असून ही ट्रेन गंतव्याच्या ठिकाणी तीन तास आधीच पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई ते दिल्ली हा प्रवास तेरा ते चौदा तासातच संपणार आहे.