लाजिरवाणी घटना : शववाहिनी न मिळाल्याने नातवाने बाईकवरुन आजोबांची डेडबॉडी नेली
आपल्या देशातील आरोग्य व्यवस्था इतकी खालावलेली आहे की एम्ब्युलन्स नसल्याने मृतदेहाची हेळसांड वारंवार होत असल्याचे प्रकार घडत आहेत. एका नातवाने त्याच्या आजोबाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्याला वाहन न दिल्याने आजोबांची डेडबॉडी त्याने आपल्या बाईकवरुन 15 किमी दूर असलेल्या आपल्या गावात वाहून नेल्याचा लाजीरवाणा प्रकार घडला आहे.
मध्य प्रदेश | 26 नोव्हेंबर 2023 : आपला देश जगातील पाचवी अर्थव्यवस्था झाला आहे. परंतू श्रीमंती आणि गरीबीतील दरी इतकी मोठी आहे की साध्या आरोग्य, शिक्षण आदी मुलभूत गरजांसाठी रोजचा संघर्ष करावा लागत आहे. आपल्या आजोबांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर उर्वरित क्रिया पार पाडण्यासाठी रुग्णालयाद्वारे वेळेत ॲम्ब्युलन्स न मिळाल्याने एका नातवाने त्यांचे पार्थिव चक्क बाईकवरुन 15 किमी अंतरापर्यंत आपल्या गावी नेल्याचे उघडकीस आले आहे. या लाजीरवाण्या प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासन हादरले असून अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत.
मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य विभागाच्या बेफिकीरीने येथील जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. रुग्णालयात एम्ब्युलन्स नव्हती तेव्हा एका नातवावर हा काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग गुदरला आहे. मिळालेल्या माहीतीनूसार शहडोल जिल्ह्यातील रुग्णालयात धुरवारचे रहिवासी लुलैया बॅगा (56) यांना दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह मिळण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी कागदी प्रक्रिया पूर्ण केली. त्यांचे गाव धुरवार जिल्हा रुग्णालयापासून 15 किमी अंतरावर असल्याने त्यांनी शववाहिनीची मागणी केली. परंतू रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या मागणीला अमान्य करीत त्यांना ताटकळत ठेवले. त्यानंतर त्यांनी तेथे बराच वेळ वाट पाहीली. परंतू रुग्णालयाने नकार घंटा कायम ठेवल्याने अखेर मृताचा नातवाने आजाबांचा मृतदेह आपल्या बाईकवरुन नेण्याचा निर्णय घेतला.
लाजिरवाणा प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल
या रुग्णालयाच्या बाहेर हा लाजीरवाणा प्रकार इतर रुग्णांना पाहायला मिळाला. ज्येष्ठ नागरिकाच्या मृतदेहाला स्ट्रेचरवर आणण्यात आले. त्यानंतर नातवाने बाईकवर बसत नातेवाईकांची मदत घेतली. नातेवाईकांनी मृतदेहाला बाईकवर कसे तरी बसविले. मृतदेह पडू नये म्हणून पाठीला चादरीने बांधण्यात आला. या घटनेचा मोबाईलवरील चित्रीत केलेला व्हीडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवले. तर जिल्हा प्रशासनाने देखील काही बोलण्यास नकार दिला.