बेळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत, रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी, संजय राऊतांचं चॅलेंज स्वीकारणार का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बेळगाव येथील शिवमोगा विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत. तसेच इतरही विकासकामांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होत आहे
बेळगाव (कर्नाटक) : कर्नाटक (Karnataka) राज्यातील बेळगावमध्ये (Belgaum) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. कर्नाटकातील ज्या भागात सर्वाधिक मराठी भाषिक आहेत, त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. कर्नाटक भाजपतर्फे मोदींच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आली आहे. बेळगावातील राणी चन्ननम्मा चौकातून पंतप्रधान मोदी यांचा दिमाखदार रोड शो आयोजित करण्यात आला. मोदींना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी उसळली. मोदींनीही गाडीतून बाहेर हात दाखवत नागरिकांना अभिवादन केलं.
शिवमोगा विमानतळाचं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बेळगाव येथील शिवमोगा विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत. तसेच इतरही विकासकामांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होत आहे. शिवमोगा विमानतळाचं वैशिष्ट्य म्हणजे सुमारे ४५० कोटी रुपयांचा निधी यासाठी खर्च करण्यात आला आहे. भव्य कमळाच्या आकाराचं हे एअरपोर्ट असून येथे दर तासाला ३०० प्रवासी बसू शकतात. कर्नाटकातील विविध रेल्वे प्रकल्प, शिकारीपुरा- रानीबेन्नूर नवी रेल्वे लाइन, कोटेगंगुरू रेल्वे कोचिंग डेपोच्याही विकासकामाचा प्रारंभ करतील.
संजय राऊत यांचं चॅलेंज काय?
आज मराठी भाषा दिन आहे. मराठी भाषिकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिन आहे. त्यामुळेच कर्नाटक राज्यात गेलेल्या बेळगावमधील मराठी भाषिक नागरिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मराठीत भाषण करावं, असं चॅलेंज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘ बेळगावमध्ये ७० टक्के मराठी भाषिक नागरिक राहतात. त्यामुळे त्यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली असती तर जगभरातील मराठी भाषिकांना एक संदेश गेला असता. तसेच जे कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर रोज अन्याय अत्याचार करतंय, त्यांनाही कडक संदेश गेला असता, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.
मोदीजी ज्या राज्यात जातात तिथे स्थानिक भाषेत भाषणाला सुरूवात करतात. आज मराठी भाषा गौरव दिनी, पंतप्रधान बेळगावात आहेत. बेळगावात मराठीत भाषणाला सुरुवात करून त्यांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर मराठी जनांना अभिमान वाटेल ! कर्नाटक सरकारला एक कडक संदेश जाईल.पहा जमतंय का!
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 27, 2023
केंद्र सरकार मध्यस्थी करणार का?
काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगाव प्रश्नी आक्रमक भूमिका घेतली होती. कर्नाटक सीमेला लागून असलेले सोलापूर, सांगलीतील काही गावेहीकर्नाटकात सामावून घेण्याची भाषा केली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री अशी मुजोरी दाखवत असल्याने महाराष्ट्रातील मविआ नेते आक्रमक झाले होते. केंद्रात, कर्नाटकात आणि महाराष्ट्रातही भाजपची सत्ता असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री ही मुजोरी कशी दाखवू शकतात, असा सवाल मविआकडून विचारण्यात येत होता. केंद्र सरकारने यात मध्यस्थी करण्याची अपेक्षे व्यक्त केली जात होती.